मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत सध्या १५च्या आसपास आमदार जायला तयार आहेत, यात पक्षातील काही बड्या नेत्यांचाही समावेश आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ आमदारांपैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही. मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील अजित पवारांच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. अजित पवारांच्या रंगलेल्या चर्चेदरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. संदीप देशपांडे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच देशाचं प्रबोधन करणारा महाराष्ट्र आज चाचपडतोय. राजकारणाचा चिखल केला गेला आहे. तात्काळ निवडणुका घ्या आणि एकदाच काय तो सोक्ष-मोक्ष लावा, असंही म्हटलं आहे.
अजितदादा, ४० आमदारांच्या सह्या अन् भाजपाप्रवेशाची चर्चा; शरद पवारांनी हवाच काढली!
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील अजित पवारांच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ही केवळ तुमच्या मनातली चर्चा आहे. या सर्व बातम्या खोट्या आहेत. अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावलेली नाही. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही. सगळे सहकारी पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत असल्याचं सांगत माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांची हवाच शरद पवारांनी काढली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी १५ दिवसांत दोन मोठी राजकीय घडामोड घडणार आहे. यामधील एक दिल्लीत आणि एक महाराष्ट्रात होणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. सुप्रिया सुळेंच्या या दाव्यानं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सुप्रिया सुळे यांना आजित पवार कुठे आहे असे विचारण्यात आले. यावर 'तुम्ही सर्व चॅनलवाल्यांनी अजितदादांच्या मागे एक युनिट लावावे. राज्यात अनेक समस्या आहेत, राज्यात चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अजित पवार भाजपासोबत जाणार का?, असा सवालही सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर 'हे दादांनाच विचारा...मला गॉसिपसाठी वेळ नाही, लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे खूप काम आहे, त्यामुळे मला त्याची माहिती नाही. पण कष्ट आणि मेहनत करणारा नेता असल्याने अजितदादा सर्वांनाच आवडतात. त्यामुळे अशी विधाने केली जातात, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळेंनी दिलं.
अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे गुण- पृथ्वीराज चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्या राज्यात सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच अजित पवारांमध्ये मुख्यमंत्रिपदाचे होण्याचे गुण आहेत. त्यामुळे अनेकांना वाटतं की अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपद लवकर मिळावं. पण भाजपासोबत जाऊन त्यांना कोणी पद देईल किंवा आश्वासन देईल, असं मला वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.