Join us

"तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही"; मनसेने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 9:20 AM

महापालिकेतील काही अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशापांडे यांनी केला आहे. 

मुंबई: राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात शुक्रवारी ३,४९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर पोहचली आहे. कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र महापालिकेतील काही अधिकारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशापांडे यांनी केला आहे. 

संदीप देशपांडे ट्विट करत म्हणाले की, सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वत:च्या तुमड्या भरुन घेत आहेत. त्यांना एकच इशारा आहे, तुमच्यावर आमची करडी नजर आहे. कोरोनाचं संकट गेलं की तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही, अशा शब्दात संदीप देशापांडे यांनी इशारा दिला आहे.

संदीप देशपांडे यांनी याआधी देखील आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती.  रुग्णांची अतिशय वाईट अवस्था आहे, एका काकांनी आजारी असल्याने १९६ फोन करुन बेडची व्यवस्था झाली नाही, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, इतकी वाईट अवस्था लोकांची झाली आहे. अधिकाऱ्यांना फोन करुन ते फोन उचलत नाहीत, लोकांची अशी अवस्था आहे, फक्त बेड्स उपलब्थ आहेत असं खोटं सांगतात पण परिस्थिती तशी नाही, ८०० बेड्स उपलब्ध आहेत असं सांगितलं जातं. कोरोनाबाधित वगळता इतर रुग्णांना उपचार मिळत नाहीत. वारंवार अधिकाऱ्यांना संपर्क करुनही कोणीही उत्तर देत नाही. आरोग्य यंत्रणेची दुरावस्था आहे. लोक मरतायेत, फक्त गोड बोलून काहीच होणार नाही, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले होते. 

दरम्यान, राज्यात  कोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी एक लाखाचा टप्पा पार केला. दिवसभरात ३,४९३ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १ हजार १४१ इतकी झाली आहे. त्यासोबतच दिवसभरात १,७१८ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत राज्यात ४७ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर विविध ठिकाणी ४९,६१६ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :राज ठाकरेसंदीप देशपांडेमनसेमुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्र सरकार