सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठावर मालवणी भाषेत माहिती देणारी कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असणारी अंकिता प्रभू- वालावलवकर गेल्या काही दिवासांआधी एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत के. ई. एम. रुग्णालयाच्या आरोग्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या रुग्णालयात रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांवर तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये परिस्थीती मांडली होती.
अंकिता यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून के. इ. एम रुग्णालयात डॉक्टरांवर असणारा ताण आणि अपुऱ्या कर्मचारी वर्गावर भाष्य केले आहे. अंकिता यांचा परिचय असलेला किरण चव्हाण (वय २३) या तरुणास मेंदूला जबरदस्त दुखापत असल्याने त्यांनी सिंधुदुर्ग येथून १४ जून रोजी केइएममध्ये दाखल केले होते. मात्र, किरणला संपूर्ण दिवस काहीच मदत मिळत नसल्याने त्या रुग्णालयात आल्या होत्या. विशेष म्हणजे या रुग्णाला ज्यावेळी सीटी स्कॅन करण्याची गरज होती, त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना रुग्णालयाचे मशीन काही तांत्रिक कारणामुळे बिघडले असून बाहेर करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी बाहेरच्या खासगी सेंटरला जाऊन तो सीटी स्कॅन करून घेतला होता.
सदर घटनेनंतर अंकिताने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांना संपर्क साधला आणि केइएम रुग्णालयातील प्रकार सांगितला. त्यानंतर अमेय खोपकर यांनी रुग्णालयात भेट देत परिस्थिती जाणून घेतली होती. यानंतर आता मनसेने केईम रुग्णालयविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केईम रुग्णालाय आणि प्रशासनाला इशारा दिला आहे. संदीप देशपांडे यांनी केईएममधील सोयी पूर्ववत करण्याबाबत पत्र लिहिले आहे. तसेच सोयी पूर्ववत न झाल्यास ३ जुलै रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
संदीप देशपांडे पत्रात नेमकं काय म्हणाले?
मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक ताळेबंद हा जवळ जवळ पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा आहे, तसेच महानगरपालिकांकडे साठ हजार कोटीच्या वर मुदत ठेवी आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेचे आरोग्य विभागाचे बजेट हे तीन हजार कोटी रुपयांवर आहे. असे असून सुद्धा महानगरपालिकेच्या मुकुटातील हिरा म्हणजे के.ई.एम रुग्णालय, त्यातील सिटी स्कॅन तसेच एम आर सेवा गेले कित्येक महिने बंद पडून आहे अनेक रुग्णांची गैससोय होत आहे व त्यांना बाहेरून एम आर आय व सिटी स्कॅन करून घेण्यास सांगत आहे. त्यामुळे आम्हाला असंख्य तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत हे महानगरपालिकेसाठी नक्कीच भूषणावह नाही. माझी आपणांस नम्र विनंती आहे कि, ३ जुलैपर्यंत सर्व सोयी पुर्ववत कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करेल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला आहे.