महाधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्याची 'गावरान' साद; अळूचं फदफदं की ठेचा अन् भाकरी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 09:00 AM2020-01-21T09:00:35+5:302020-01-21T09:08:33+5:30
सोशल मीडियावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विविध पोस्टर्स, व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
मुंबई - मनसेच्या महाधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नव्या भूमिकेत दिसणार असून मनसेची आगामी भविष्यातील वाटचाल काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याचं बोललं जात असून मनसेच्या झेंड्यातही बदल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
यातच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या रोज नवीन नवीन ट्विटमुळे अवघ्या ४८ तासांवर आलेल्या महाधिवेशनात मनसेची भूमिका काय असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मंत्रालयातील गोड गोड अळूच फदफद आवडत की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा असं ट्विट त्यांनी केलं आहे. तर त्यापूर्वी ज्यांना लाचारीचा तिटकारा आहे आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान आहे त्यांनी राज साहेबांचे नेतृत्व स्वीकारायला हवे असं सांगत महाविकास आघाडीमुळे नाराज कार्यकर्त्यांना साद घातली होती.
मंत्रालयातील गोड गोड अळूच फदफद आवडत की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा....
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 21, 2020
।। मराठा तितुका मेळावा।
महाराष्ट्र धर्म वाढवावा ।।
सोशल मीडियावर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विविध पोस्टर्स, व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात येत आहेत. अशातच विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा या टॅगलाईनमुळे मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भर देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवल्यानंतर मनसेने नाराज शिवसैनिकांना जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केला होता. तर २३ तारखेलाही अन्य पदाधिकारी प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे.
मनसेचा झेंडा बदलून भगव्या रंगाचा झेंडा मनसे आणणार आहे. त्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचे अधिकृतरित्या राजकीय लॉन्चिंग करण्यात येणार असल्याचं समजतं. तूर्तास मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाधिवेशनात काय बोलतील याकडे राजकीय वर्तुळासह कार्यकर्त्यांतेचेही लक्ष लागून आहे. गणपती, दहिहंडी या हिंदू सणावर निर्बंध आलेले असताना मनसे ठामपणे उभी राहिली तसेच आझाद मैदानावरील रझा अकादमीच्या निषेधार्थ मनसेकडून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मात्र सत्तानाट्यात राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाल्याने मनसे नव्याने राजकारणात आपली स्पेस निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. नेमका हा बदल काय असेल यासाठी २३ जानेवारीच्या महाधिवेशनापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे.