MNS Sandeep Deshpande News: सर्वांना बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावाचून पर्याय नाही, हेच दिसते आहे. जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागेल. या गद्दारांनीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलाच होता. त्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.
मनसेचा गुढीपाडवा मेळावा ३० मार्च रोजी आहे. यासंदर्भातल्या टिझरसाठी राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो घेतले. पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना, यासंदर्भात उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसे आणि राज ठाकरेंना सदर टोला लगावला. याला आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का?
संदीप देशपांडे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंग वर लावणे हे पक्षाचे धोरण नाही .एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते पण श्री उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी ते फक्त तुमचे वडील असं कस काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
दरम्यान, ठाकरेंनी आपल्या सख्ख्या भावांना पद्धतशीरपणे दूर केले. बाळासाहेबांची वैचारिक संपत्ती त्यांनी सोडली. पण इतर प्रॉपर्टीसाठी भावासोबत दावा मांडला. हा दावा कोर्टात गेला. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसांत त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या भावांचा काटा काढला. उद्धव ठाकरे यांनी वेगळे काय केले? उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत, या शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पलटवार केला.