संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 04:11 PM2022-04-03T16:11:01+5:302022-04-03T16:12:12+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्षेपाच्या विधानाचे पडसाद आज राज्यभर उमटताना दिसत आहेत
मुंबई-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्षेपाच्या विधानाचे पडसाद आज राज्यभर उमटताना दिसत आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदीसमोर आम्ही दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू, असा इशारा काल राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात दिला. राज ठाकरेंच्या या विधानावरुन राज्यात राजकारण सुरू झालं आहे. आज सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज यांच्या विधानाचा समाचार घेत मशिदीच्या आणि तुमच्या भोंग्याचं काय करायचे ते सरकार बघेल. नुसती टीका करून काय होणार? अशानं हाती असलेलं देखील गमवाल, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पलटवार केला आहे.
"ज्यांची अक्कल गुडघ्यात आहे त्यांनी अक्कल दाढेवर बोलू नये. सध्या ते बिझी आहेत. अनेक जमिनी अलिबागमध्ये आहेत. त्यांचा हिशोब ईडीला द्यायचाय. हजारो कोटी मनपाचे खाल्ले त्याचा हिशोब त्यांना द्यायचाय आणि राज साहेब जे काल बोलले ते झोंबलेलं दिसतंय. संजय राऊतांचा भोंगा तर रोज सकाळी ९ वाजता वाजतोच. त्यांना काय एवढं महत्व द्यायचं", असं संदीप देशपांडे म्हणाले.
"कालच्या सभेतून एक गोष्ट कळली, ती म्हणजे अक्कलदाढ उशिरा येते", अशा शब्दांत राऊत यांनी राज यांना टोला लगावला होता. त्यावर संदीप देशपांडे बोलत होते. "संजय राऊतांचा शरद पवारांच्या नावाचा भोंगा तर रोज सकाळी वाजत असतो. त्यामुळे त्यांची विचारसरणीच तशी झाली आहे", असं संदीप देशपांडे म्हणाले.