Join us  

"आम्ही भाजप नाही की, खोट्या..."; महिन्यात भूमिका बदलली म्हणणाऱ्या राऊतांना मनसेचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 1:36 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिन्याभरात भूमिका बदलल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती

MNS Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दृष्टिकोन बदलल्याचे दिसत आहे. काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा राज ठाकरेंनी केली. विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढवणार असल्याचे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. या निर्णयावरुन राज ठाकरे यांनी महिन्याभरात भूमिका बदलल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. त्यावरुन आता मनसेने संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला २२५ ते २५० जागा लढवायच्या आहेत असं राज ठाकरेंनी जाहीर केलं. यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला. महाराष्ट्रात अपशकून घडवून आणण्यासाठी असे निर्णय घेतले जात आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

"राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत. ते बराच काळ तिकडे होते. त्यामुळे राज्यात काय सुरू आहे, हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे शत्रू अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना ‘बिनशर्ट’ पाठिंबा दिला होता. आता फक्त एका महिन्यात त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे, हे आश्चर्यकारक आहे. राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. मात्र, महाराष्ट्रात अपशकून घडवून आणण्यासाठी असे निर्णय घेतले जात आहेत का? हे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी पक्षांना बघावं लागेल," अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मनसेचे प्रत्युत्तर

संजय राऊत यांच्या टीकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते टीव्ही९ मराठीशी बोलत होते. "खोट्या नरेटीव्हला बळी पडायला आम्ही भाजप नाही. संजय राऊतांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्यापूर्वी आधी स्वत:च्या हृदयात झाकून बघावं. सत्ता मिळवण्यासाठी आपण काय घाणेरड्या खेळी केल्या, हे त्यांनी आठवून बघावं. २०१९ पूर्वी ज्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसून तुम्ही निवडणूक लढवली, तेव्हा ते महाराष्ट्राचे मित्र होते की शत्रू? वरळीत केमच्छो वरळीचे पोस्ट लावताना तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही का?," असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.  

टॅग्स :राज ठाकरेमनसेसंजय राऊतविधानसभाउद्धव ठाकरे