मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईतील रविंद्रनाट्य मंदिर येथे मनसेच्या प्रमुख नेत्यांचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. त्यांनी पुन्हा एकदा नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं आहे.
राज ठाकरेंनी याआधीही एका मुलाखतीत नुपूर शर्माचे समर्थन केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा नुपूर शर्माच्या विधानाचं समर्थन करत, त्यांनी माफी मागायची काही गरज नसल्याचा पुनरुच्चार राज ठाकरेंनी केला. नुपूर शर्मा ज्या बोलल्या तेच झाकीर नाईक बोलला होता. मात्र झाकीर नाईकवर कोणतीच कारवाई झाली नाही. झाकीर नाईकला कोणी माफी मागायला लावत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी केली. दुसरीकडे ते औवेसी भाऊ, आपल्या देवी-देवतांच्या नावावरुन हेटाळणी करतात, तेव्हा कोणी बोलत नाही, असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.
राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये सगळे तथाकथित हिंदुत्व वादी शेपूट घालून बसले असताना राज ठाकरे हे एकमेव नेते ज्यांनी नुपूर शर्मा यांचं जाहीर समर्थन केले. बाळासाहेबांचे विचार हे राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेबांनी मला मिठित घेतलं-
मी बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो. शिवसेनेतून बाहेर पडतोय हे सांगण्यासाठी मी बाळासाहेबांकडे गेलो होतो. तेव्हा तिथे मनोहर जोशी उपस्थित होते. ते खोलीच्या बाहेर गेले. मनोहर जोशी बाहेर गेल्यानंतर तिथे मी आणि बाळासाहेब ठाकरे असे दोघेच होतो. तेव्हा बाळासाहेबांनी हात पसरले. मला मिठीत घेतले आणि म्हणाले की आता जा. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला, असे राज ठाकरे म्हणाले.