Join us

घरातून बाहेर न पडताही देशातले पहिले मुख्यमंत्री ठरले, उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटतं; संदिप देशपांडेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 7:10 PM

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला.

उद्धव ठाकरेंचं एका बाबतीत फार कौतुक वाटतं, मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. मी हा पहिला मुख्यमंत्री पहिलाय जो घरातून बाहेर पडला नाही, पण देशातला नंबर वन मुख्यमंत्री झाला. कसे झालात तुम्ही? चार संस्थांनी पूर्ण भारतात सर्व्हे केला. भारतात किती लोकांना विचारलं तुम्ही? दीडशे कोटी लोकांमध्ये २०० लोकांना विचारलं आणि त्यापैकी ८० लोकांनी म्हटलं आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नंबर वन वाटतात आणि म्हणून हे भारताचे नंबर वन मुख्यमंत्री झाले. घरात बसलेली व्यक्ती नंबर, त्यांचेच लोक सगळीकडे हे सांगत फिरतात,” असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला. “कोरोनामध्ये लोकांचे काय हाल झाले हे आपण पाहिले. भ्रष्टाचाराचा सर्वात मोठं जंबो सेंटर जर कुठे असेल तर ते मुंबईत निर्माण केलंय. सेंटरमध्ये हजारो सिलिंग फॅन पालिकेने लावले. त्या फॅनचे दिवसाला १०० रुपये भाडं दिलं. ते फॅन आपण दीड वर्षे वापरले. दीड हजाराच्या सिलिंग फॅनसाठी लाखभर भाडं दिलं. एक सिलिंग फॅन लाख रुपयाला पडला. तुम्ही इतरांना म्हणताय खोके घेतले, तर मातोश्रीवर किती कपाटं गेली. याचा हिशोब लोकांसमोर येऊ द्या,” असंही देशपांडे म्हणाले.

२५ वर्षे महापालिकेत सत्तेत आहेत. आधी बजेट २५ हजार कोटी होतं, आता ते ३६ हजार कोटी झालं. रस्त्यांना दरवर्षी सरासरी दोन हजार कोटी खर्च करतो. पाच वर्षांना १० हजार कोटी झाले. २५ वर्षांत ५० हजार कोटी झाले. ५० हजार कोटी रुपयांचे रस्ते दिसतायत का? ५० हजार कोटी गेले कुठे? असा सवालही त्यांनी केला. १६३२६ कोटी मिठी नदीसाठी खर्च केले. किती सफाई झाली त्याची? ही कपाटं गेली कुठे हा आमचा प्रश्न आहे तुम्हाला असंही ते म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेसंदीप देशपांडेमनसे