Join us

“करारा जवाब मिलेगा”; मनसेकडून राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तरसभेचा टीझर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 7:21 PM

१२ तारखेच्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई: गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर यावरून मनसेमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेच्या काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामाही दिला. तर पुण्यात वसंत मोरे यांच्याकडून शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आले. यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांची तोफ धडाडणार असून, ठाण्यात होणाऱ्या सभेला उत्तरसभा असे म्हटले जात आहे. १२ एप्रिल रोजी ही सभा होणार असून, याचा एक टीझर मनसेकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. 

ठाण्यात १२ एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमधे राज ठाकरेंच्या भाषणावर राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मनसे नेते संदिप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना  राज ठाकरे करारा जवाब देणार असे म्हटले आहे. 

महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर उलटसुलट चर्चा अजूनही सुरु आहे. त्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार यावर भाष्य केले होते. तसेच महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला होता. आता १२ तारखेच्या ठाण्यातील सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसेमध्ये दोन गट पडले आहेत. पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर सोलापूरसह अन्य ठिकाणच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेठाणे