ठाणे: मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद आठवडाभरानंतरही राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावर मांडलेल्या भूमिकेवरून राजकीय वर्तुळातून अद्यापही प्रतिक्रिया येत आहेत. पाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे ठाण्यात आणखी एक सभा घेणार असून, मनसेतर्फे याला उत्तरसभा असे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसेकडून आणखी एक टीझर जारी करण्यात आला आहे. अलीकडेच पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटरवरून दुसरा टीझर जारी केला आहे. राज ठाकरे आणि त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या सभेत राज ठाकरे नेमके काय बोलू शकतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. १२ एप्रिल रोजी राज ठाकरे यांची ठाण्यात उत्तरसभा आहे.
राज ठाकरे यांच्या आवाजातील गाजलेला डायलॉग
संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या दुसऱ्या टीझरमध्ये राज ठाकरे यांच्या आवाजातील एक डायलॉग देण्यात आला आहे. वारं खूप सुटलंय आणि जे सुटलंय, ते आपलंच आहे, असा डायलॉग या टीझरमध्ये घेण्यात आला आहे. तसेच या टीझरच्या पोस्टरमध्ये होय.. हिंदूधर्माभिमानी असेही दाखवण्यात आले आहे.
दरम्यान, पहिल्या टीझरवेळी करारा जवाब मिलेगा, असे कॅप्शन देऊन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जवाब देणार असे म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसेमध्ये दोन गट पडले आहेत. पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर सोलापूरसह अन्य ठिकाणच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.