Maharashtra Politics: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना, मनसेही सातत्याने शिवसेनेवर टीका करताना पाहायला मिळत आहे. यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे. यात अनेक प्रश्नांची सरबत्ती केली असून, त्या अनुषंगाने सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी डाव साधत बंडखोरी केल्याचा मोठा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर पलटवार करत आरसा दाखवला आहे. अनधिकृत भोंग्यांविरुद्ध आंदोलन करण्याऱ्या महाराष्ट्र सैनिकांना तडीपार केलंत जेल मध्ये टाकलेत त्याची सहानभूती हवीय की स्वतःच्याच भावाचे अमित आजारी असताना नगरसेवक चोरलेत त्याची सहानभूती हवीय? अशी विचारणा करण्यात आली आहे.
बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात
संदीप देशपांडे यांनी अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगला हडप केलात त्याची सहानभूती पाहिजे की त्याच्याच बाजूला असलेल्या महाराष्ट्र दालनाची दुरावस्था झाली आहे त्याची सहानभूती पाहिजे? असा सवाल करत, वरळीत केम छो वरळी चे बोर्ड लावलेत त्याची सहानभूती हवीय की चतुर्वेदी ना खासदार केलंत त्याची सहानभूती हवीय? गेली पंचवीस वर्षे महानगर पालिका भ्रष्टाचाराने पोखरलीत त्याची सहानभूती हवीय ? की सगळे अमराठी भ्रष्टाचारी कंत्राटदार महापालिकेत पोसलेत त्याची सहानभूती हवीय?, अशा अनेक प्रश्नांची यादीच संदीप देशपांडे यांनी आपल्या पत्रात दिली आहे.
दरम्यान, आम्ही गेली २५ वर्ष रस्त्यात नाही खड्यात चालतोय आम्हाला सहानभूती कधी मिळणार? २५ वर्ष मुंबई ची तुंबई होतेय आम्हाला सहानभूती कधी मिळणार??कशाची सहानभूती पाहिजे तुम्हाला? करोना काळात लपून बसलात त्याची की पन्नास लाखांचं घड्याळ मिळालं त्याची?महापौरांच्या मुलाला करोना काळात कंत्राट दिल त्याची सहानभूती पाहिजे की की लोकांचे करोना मध्ये हाल होत असताना रात्री उशिरापर्यंत पब ना परवानगी दिलीत त्याची सहानभूती पाहिजे? अशी विचारणा करत संदीप देशपांडे यांनी खरमरीत टीकास्त्र सोडले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"