" मी, माझं आणि मलाच; आई 'बबड्या'साठी एवढं तर करणारच"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:56 PM2020-08-22T14:56:27+5:302020-08-22T15:00:04+5:30
मनसेचे नेते संतोष धूरी यांनी किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे.
मुंबई: कोरोना काळात कुणीही राजकारण करु नका असं वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवाहन करत असताना मात्र राजकारण करु नका, भ्रष्टाचार करा असा कारभार सध्या मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून सुरु आहे असा घणाघाती आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी केला आहे. कोरोना सेंटरच्या नावाखाली शिवसेनेकडून भ्रष्टाचार सुरु आहे याचा जाब मनसे विचारणार असं त्यांनी सांगितले आहे. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसेचे आरोप फेटाळून लावले आहेत. परंतु याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संतोष धूरी यांनी किशोरी पेडणेकर यांना टोला लगावला आहे.
मी, माझं आणि मलाच; आई बबड्यासाठी एवढं तर करणारच, असं ट्विट करत संतोष धूरी यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
मी, माझंआणि मलाच .आई बबड्यासाठी एव्हढ तर करणारच #ResignMumbaiMayor
— Santosh Dhuri (@SantoshDhuri19) August 21, 2020
वरळी भागातील कोरोना सेंटरमधील कंत्राट स्वत:च्या मुलाच्या कंपनीला पदाचा गैरवापर करुन देण्यात आला. याबाबतची कागदपत्रे त्यांनी पत्रकारांसमोर दाखवली होती. फक्त वरळी नव्हे तर मुंबईतील अन्य भागातही अशाप्रकारे महापौराच्या मुलाच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. महापौराचे चिरंजीव साईप्रसाद पेडणेकर यांच्या कंपनीला नियमबाह्य कंत्राट देण्यात आलं असा त्यांचा आरोप होता.
कोरोना काळात आपत्कालीन संकट म्हणून महापालिकेकडून कोणत्याही प्रकारे टेंडर न काढता कामांचे वाटप केले जात आहे. या कामात आपल्याच ओळखीच्या माणसांना ज्यांना कोणताही अनुभव नसताना कामांचे कंत्राट दिले जातात. महापालिकेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये यासाठी सभागृह चालू दिले नाही. पंतप्रधानांपासून सर्वजण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे काम करत असताना मुंबई महापालिकेचे सभागृह कामकाज का चालत नाही? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता.
महापौरांच्या मुलाला कंत्राट मिळणे गैर नाही पण महापौरांच्या मुलालाच कंत्राट मिळणे गैर pic.twitter.com/vNf1RjrOYU
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 21, 2020
संदीप देशपांडे यांनी आरोप केल्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहे. किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस या कंपनीचे संचालक प्रशांत गवस हे आहेत. माझा मुलगा या कंपनीत सहसंचालक आहे हे मी नाकारत नाही. परंतु कंपनीला महापालिकेच्या कायदा आणि नियमाप्रमाणे काम मिळाले काही लोकांनी जर आक्षेप असेल तर ते मुंबई महापालिकेकडे चौकशी करु शकतात. २०११ मध्ये या कंपनीची स्थापना झाली आहे. यापूर्वीही कंपनीने मुंबई महापालिकेची छोटी-मोठी कामे केली आहेत. कोविडच्या काळात मनुष्यबळाची कमतरता असल्याने या कंपनीला मनुष्यबळ पुरवण्याचे काम देण्यात आले असं त्यांनी सांगितले.
तसेच माझा मुलगा प्रथम देशाचा नागरिक आहे त्यामुळे त्याला स्वत:चा व्यवसाय करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तो जर काही चुकीचा करत असेल तर मी त्याचा निषेध केला असता. परंतु महापालिकेच्या नियमानुसार त्याला कंत्राटाने काम मिळालं आहे. महापौरांची मुलगा म्हणून जर चुकीचे आरोप करत असाल तर त्याचा मी निषेध करते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुनच कंत्राट मिळाले असल्याने पोटशूळ उठण्याचे कारण काय? हे मुंबईकरांना माहिती आहे. मुंबईच्या जनतेला वस्तूस्थिती समजावी यासाठी मी स्पष्टीकरण देत असल्याचा टोला किशोरी पेडणेकर यांनी मनसेला नाव न घेता लगावला आहे.