Join us  

आपलं वय काय, कोणाबद्दल बोलतोय, याची समज आली का?; सुजात आंबेडकरांना मनसेनं फटकारलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 3:20 PM

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई- गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जहाल हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेत थेट मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या सभेनंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्ष शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चौफेर हल्ला चढवला. मशिदीवरील भोंगे सरकारने हटवावे अन्यथा आम्ही भोंग्यासमोर दुपटीने लाऊडस्पीकर लावत हनुमान चालीसा लावू असं राज ठाकरेंनी म्हटलं होते.

राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरुन अनेक नेत्यांनी टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी देखील राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं. 

सुजात आंबेडकरांच्या या टीकेनंतर मनसेनेही प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी सुजात आंबेडकरांवर निशाणा साधला आहे. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है.., असं म्हणत सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितले आहे. तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का....?, असा सवाल शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, मुस्लिम बांधवांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आता आमची आहे, असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं. तसेच माझी राजसाहेबांना विनंती आहे की तुम्ही शरद पवारांचा इंटरव्ह्यू घ्या किंवा मग स्वत: पक्ष भाड्यानं लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा. पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू-मुस्लीम दंगलीवर उभा करू नका", असंही सुजात आंबेडकर म्हणाले होते. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेवंचित बहुजन आघाडी