रुग्णांना मृत्यूनंतर सन्मानजनक वागणूक मिळावी; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 01:27 PM2020-04-24T13:27:29+5:302020-04-24T14:32:29+5:30

केईएम रुग्णालयात रविवारी कोव्हिड कक्षामध्ये मृत्यू झालेल्या दहा जणांचे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयाच्या शवागारात जागा नव्हती.

MNS leader Shalini Thackeray has demanded that patients should be treated with dignity after death | रुग्णांना मृत्यूनंतर सन्मानजनक वागणूक मिळावी; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी

रुग्णांना मृत्यूनंतर सन्मानजनक वागणूक मिळावी; मनसेची उद्धव ठाकरेंकडे मागणी

Next

मुंबई: कोरोना विषाणूने निर्माण केलेल्या आव्हानावर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार तसंच महापालिका प्रशासन अथक परिश्रम घेत आहेत. मात्र, दुर्दैवाने कोरोनाची लागण होणाऱ्यांची आणि त्यामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु असं असतानाही रुग्णांना मृत्यूनंतर सन्मानजनक वागणूक मिळायला हवी, अशी मागणी मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी पत्राद्वारे रुग्णांना मृत्यूनंतर मिळत असलेल्या वागणुकीकडे उद्धव ठाकरेंचे लक्ष वेधले आहे. शालिनी ठाकरेंनी म्हटले आहे की, केईएम रुग्णालयात रविवारी कोव्हिड कक्षामध्ये मृत्यू झालेल्या दहा जणांचे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णालयाच्या शवागारात जागा नव्हती. त्यामुळे हे मृतदेह रुग्णालयाच्या २० क्रमांकाच्या कोव्हिड कक्षामध्येच ठेवण्यात आले. सोमवारी सायंकाळी त्यांतील पाच मृतदेहांसाठी विशेष किटची व्यवस्था करण्यात आली, तर पाच मृतदेह हे घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात येणाऱ्या पिशव्यांच्या सहाय्याने सीलबंद करण्यात आले, असं शालिनी ठाकरे यांनी सांगितले.

दुसरी घटना आहे, कूपर रुग्णालयातली. या रुग्णालयात बुधवारी मृत्यू झालेल्या दोन रुग्णांचे मृतदेह हे १२ तासांहून अधिक काळ पडून होते. हे रुग्ण कोरोना संशयित होते आणि त्यामुळे त्यांच्या मृतदेहाजवळ जायला कुणी धजावत नव्हतं. आमच्या मनसे पदाधिका-यांनी याबाबत जाब विचारला असता, रुग्णालयात सध्या एकच चतुर्थश्रेणी कामगार कार्यरत असल्याचं अधिष्ठात्यांनी सांगितलं.

तिसरी घटना आहे, नवी मुंबईतली. संगीता मोहिते या वृद्ध महिलेला शनिवारी ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर सानपाड्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न त्यांच्या नातेवाईकांनी केला. मात्र कोरोनाला घाबरुन खासगी रुग्णालयाने त्यांना अॅडमिट करुन घेतले नाही. अखेर वाशी महापालिका रुग्णालयात त्यांना शनिवारी रात्री दाखल करण्यात आले, त्याच रात्री त्यांचं निधन झालं. मात्र, त्यांचा मृतदेह त्यांच्या मुलाकडे तीन दिवसांनंतर म्हणजे मंगळवारी रात्री सुपूर्द करण्यात आला. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता का, या वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयाला तीन दिवस लागले.

मला पूर्ण कल्पना आहे की, आपल्या वैद्यकीय यंत्रणेवर कोरोनामुळे प्रचंड ताण आलेला आहे. मात्र, एकीकडे खासगी रुग्णालयांत सर्वसामान्य रुग्णांनाही नाकारण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे ज्या कोरोनाबाधितांचा मृत्यू होतोय, त्यांची मृत्यूनंतरही अवहलेनाच होत असल्याचे सांगत  शालिनी ठाकरे यांनी काही सूचना केल्या आहेत.

१. सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचार नाकारुन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या खासगी रुग्णालयांवर आपण कठोर कारवाई करावी.

२. कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्यास तो रुग्ण कोरोनाबाधित होता की नाही, याबाबत केली जाणारी वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर करुन एका विशिष्ट कालमर्यादेत रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यासाठी योग्य ते आदेश द्यावेत.

३. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह सीलबंद करण्यासाठी अत्यावश्यक सामग्री सर्व संबंधित रुग्णालयांत तत्काळ उपलब्ध करुन द्यावी.

४. राज्य सरकारच्या किंवा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पुरेशा संख्येने चतुर्थश्रेणी कर्मचारी नसल्यास अग्रक्रमाने त्यांची भरती करण्यात यावी.

५. मृतदेहांना सीलबंद करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय मानसोपचारतज्ज्ञांच्या माध्यमातून समुपदेशन करण्यात यावे.

Web Title: MNS leader Shalini Thackeray has demanded that patients should be treated with dignity after death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.