मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान देणारे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. राणा यांना रोखण्यासाठी हजारो शिवसैनिक मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जमले होते. दरम्यान, या शिवसैनिकामध्ये एका ८० वर्षांच्या आजींनी लक्ष वेधून घेतले होते. झुकेगा नही म्हणत या आजींनी केलेल्या आंदोलनाची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांनी घेतली होती. तसेच त्यांनी सहकुटुंब जात या आजींची भेट घेतली होती. या भेटीवरून आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे.
“फायर आजींची भेट घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आजीने ‘हातच्या कंकणाला आरसा कशाला’ अशी परिस्थिती दाखवून दिली....!!!! कट्टर शिवसैनिक अजूनही हक्काचे घर आणि नोकरीपासून आजही वंचित,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्र्यांनी घेतली भेटमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आमच्या घरी आले. त्यांचे पाय आमच्या घराला लागले. त्यामुळे आनंद झाल्याची भावना आजी चंद्रभागा शिंदेंनी बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांचे आशीर्वाद घेतले. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठिशी असल्याचं आजी मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तोंडावरचा मास्क हटवला आणि आजींसोबत संवाद साधला. त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.