गेल्या काही दिवसांपासून राज्यात एक वेगळंच राजकारण पाहायला मिळत आहे. हनुमान चालीसाच्या पठणावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर उभे ठाकले. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांकडूनही ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली. राणा दाम्पत्याला यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच त्यांच्याविरोधात १२४ अ हे राजद्रोहाशी संबंधित कलम लावल्याची माहितीही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. दरम्यान, आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे.
“दोन दिवसांच्या कलानागर मधील नाट्य प्रयोगानंतर मातोश्री वरील कार्यकर्त्यांच्या मनातील भावना... थप्पड मारने से डर नहीं लगता साहब ,पर हनुमान चालीसा से लगता हैं…!!!,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी शिवसेनेला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला.
पोलिसांनी याच प्रकरणात राणा दाम्पत्याच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली होती. त्यानंतर गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शोध पोलीस घेत होते. याप्रकरणी आता ६ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच इतरांचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.