ज्यांच्यामुळे सेनेतून दिग्गज बाहेर, त्यांच्याच हातून पक्षही गेला; शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 11:32 AM2024-01-17T11:32:36+5:302024-01-17T11:38:14+5:30
शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
Sharmila Thackeray ( Marathi News ) : मुंबई- विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर निकाल दिला. यात त्यांनी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे सांगितले. यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले. तर दुसरीकडे काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निकालावरुन आरोप केले. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आता मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
“संजय राऊत-उद्धव ठाकरेंनी आपला अमूल्य सल्ला तेव्हा का दिला नाही”; योगी आदित्यनाथ यांचा सवाल
"आज एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. ज्या माणसामुळे शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावं लागलेलं आज त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय, असा टोला महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या शर्मिला ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी टीका केली.
दरम्यान, काही दिवासापूर्वी एका कार्यक्रमानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र आले होते, त्यावेळी उद्धव ठाकरे आमि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चेवेळीही शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रीया देत, एकत्र येतात का बघूया , असा सूचक इशारा दिला होता. तर दुसरीकडे आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे भाच्याच्या साखरपुड्यात एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या सारखपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एक येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
'जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची'
उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी कायदेतज्ज्ञांसह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते. "नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची?" असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. "सुप्रीम कोर्टाकडून आता शेवटची आशा आहे. लोकशाहीचा मूलभूत घटक असणाऱ्या जनतेच्या न्यायालयात आपण आलो आहोत! सरकार कोणाचंही असलं तरी, सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. माझं आव्हान आहे. नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा."
"शिवसेना जर तुम्ही विकली असाल तर मी जिथे जिथे जातो, तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे?, राज्यपालांना विनंती करतो, एक अधिवेशन पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो, विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा. मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला त्यांना... व्हीपचा अर्थ आहे चाबूक... चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.