मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाकडून वाडिया रुग्णालयासाठी दिला जाणारा निधी अनेक वर्षांपासून थकित असल्यामुळे वाडिया रुग्णालयाचा कारभार ढबघाईस आला आहे. याचा फटका रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांना बसत असल्याने रुग्णालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्य सरकारने वाडिया रुग्णालय बंद करण्याच्या विरोधात आज लाल बावटा कामगार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील या आंदोलनात सहभागी होऊन काहीही झालं तरी वाडिया हॉस्पीटल बंद होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, काहीही झालं तरी वाडिया रुग्णालय आम्ही बंद होऊन देणार नाही. तसेच आमचे हात जोडलेले आहेत ते असेच जोडलेले राहू द्या असा इशारा देखील शर्मिला ठाकरे यांनी दिला आहे. सरकारने मुंबईतली महत्वाची आणि मध्यमवर्गीयांना परवडेल अशी रुग्णालये वाटवली पाहिजेत असं मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे वाडिया रुग्णालयाबाबत महापालिका आणि संबंधित मंत्र्यांनी लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी शर्मिला ठाकरे यांनी केली आहे.
महापालिका अनुदानाची थकबाकी देत नसल्याने रुग्णालय बंद करावे लागणार असल्याचा दावा करणारे वाडिया प्रशासन आणि पालिकेने परस्परविरोधी दावे केले आहेत. मागील आठवड्यापासून वाडिया रुग्णालयाने नव्या रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया देखील थांबवली आहे. अनुदानाअभावी वैद्यकीय सेवा आणि औषधांसह विविध सेवा देणाऱ्या व्हेन्डर्सना पैसे देता आलेले नाहीत. त्याचप्रमाणे रुग्णालयातील औषधांचा साठाही संपला आहे. निधी नसल्याने रुग्णसेवा पुरवणे कठीण झालं आहे. त्यामुळे 50% बेड सध्या कमी केले आहेत. केवळ आपत्कालीन सेवा सुरु आहे. हे रुग्णालय चांगलं आहे, सरकारने याला अनुदान दिलं पाहिजे, अशी मागणी आता रुग्णाच्या नातेवाईक करत आहेत”, अशी माहिती रुग्णालयाच्या संचालिका डॉ. शकुंतला प्रभु यांनी दिली आहे.