Join us

शिशीर शिंदे 19 तारखेला करणार शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 8:03 AM

बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती.

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते शिशीर शिंदे यांचा 'स्वगृही' परतण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापनदिनी त्यांचा अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश होईल. त्यामुळे मुंबई उपनगरात मनसेला मोठा फटका बसणार आहे. काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता शिशीर शिंदे लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. शिशीर शिंदे शिवसेनेत जाण्याविषयी काहीशा द्विधा मनस्थितीत होते. त्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी स्पष्टता नव्हती. मात्र, महिनाभर विचार करून त्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब  केले.यापूर्वी राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठे खिंडार पडेल.मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्यावेळी निर्णयप्रक्रियेपासून  दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून, मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती. गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे हे मनसेच्या विभागवार बैठका आणि कार्यक्रमांपासून दूर राहत होते. 

राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेत मारहाण करणाऱ्या मनसे नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे ते बराच काळ चर्चेतही होते. एकूणच राज यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते म्हणून शिशीर शिंदे यांचा लौकिक होता. 

शिशीर शिंदेंचा राजकीय प्रवास

- शिशीर शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु केली.- 1992 साली ते मुलुंडमधील शिवसेनेचे नगरसेवक होते.- शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिले होते- शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमधील त्यांचा सहभाग कायमच चर्चेचा विषय असायचा.- बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती.- शिशीर शिंदेंनी 1991 मध्ये वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती.- 1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते.- त्यांनी 2006 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला.- 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेच्या तिकीटावर विजय मिळवला होता.

टॅग्स :शिशीर शिंदेमनसेशिवसेनाउद्धव ठाकरे