मनसेला आणखी एक खिंडार; शिशीर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 11:27 AM2018-05-17T11:27:44+5:302018-05-17T11:40:00+5:30
राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता.
मुंबई: आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते शिशीर शिंदे लवकरच आपल्या स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता शिशीर शिंदे लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठे खिंडार पडेल.
राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेत मारहाण करणाऱ्या मनसे नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे ते बराच काळ चर्चेतही होते. एकूणच राज यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते म्हणून शिशीर शिंदे यांचा लौकिक होता.
मात्र, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्यावेळी निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून, मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती. गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे हे मनसेच्या विभागवार बैठका आणि कार्यक्रमांपासून दूर राहत होते.
अजूनही तळ्यात-मळ्यात
दरम्यान, www.lokmat.comशी बोलतना शिंदे यांच्या निकटवर्तीयाने अद्याप शिवसेनेत जाण्याविषयी त्यांचा निर्णय झालेला नसल्याचा दावा केला. जुने मित्र आणि मनसेतून शिवसेनेत गेलेले दिलीप लांडे यांच्या मुलाच्या बीकेसीतील एमएमआरडीए मैदानातील लग्नात शिंदेंची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्याचे या निकटवर्तीयाने मान्य केले. मात्र ती भेट ओझरती असल्याने जास्त बोलणे झाले नाही, असेही त्याने सांगितले. मनसेतून पुन्हा स्वगृही जाण्याच्याविषयावर ते शिशीर शिंदे स्वत: मात्र अधिकृतरीत्या काहीही बोलायला तयार नसल्याचे कळते.
शिशीर शिंदेंचा राजकीय प्रवास
- शिशीर शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु केली.
- 1992 साली ते मुलुंडमधील शिवसेनेचे नगरसेवक होते.
- शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिले होते
- शिवसेनेच्या अनेक आंदोलनांमधील त्यांचा सहभाग कायमच चर्चेचा विषय असायचा.
- बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती.
- शिशीर शिंदेंनी 1991 मध्ये वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती.
- 1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते.
- त्यांनी 2006 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला.
- 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी मनसेच्या तिकीटावर विजय मिळवला होता.