"पळून गेलेले ५ नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असं समजू नका"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 02:14 PM2020-07-10T14:14:24+5:302020-07-10T14:17:39+5:30
मनसेने नेते वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे पारनेरमधील झालेल्या घडामोडीनंतर शिवसेनेवर टीका केली आहे.
मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेले शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दिला होता. त्यानंतर पाच नगसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पुन्हा शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र या सर्व घडामोडींवर मनसेने निशाणा साधला आहे.
मनसेने नेते वसंत मोरे यांनी फेसबुकद्वारे पारनेरमधील झालेल्या घडामोडीनंतर शिवसेनेवर टीका केली आहे. वसंत मोरे म्हणाले की, आम्ही डरकाळी फोडली आणि ५ पळून गेलेले नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असे समजू नका. हा भारत देश आहे, इकडे पतिव्रता असलेल्या सितामाईला ही रावणाने पळवून नेल्यानंतर जेव्हा परत आणलं गेलं तेव्हा सीतामाईलाही अग्नी परीक्षा द्यावी लागली होती. त्यामुळे तुमचे नगरसेवक कुठली परीक्षा देणार असा सवालही वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे. तसेच मला अभिमान आहे मी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा नगरसेवक आहे. जो गेला उडत तो गेला उडत आम्ही कोणाच्या पाया पडत नाही, असा टोला देखील वसंत मोरे यांनी शिवसेनेला लगावला आहे.
आम्ही डरकाळी फोडली आणि ५ पळून गेलेले नगरसेवक परत आले म्हणजे खूप मोठी लढाई जिंकली असे समजू नका,
हा भारत देश आहे इकडे...
Posted by Vasant More on Wednesday, 8 July 2020
पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. तसेच महाविकास आघाडीतील समन्वयावरच यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं. यानंतर उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना फोन केला. अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यानं उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली. आमचे नगरसेवक परत पाठवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. मंगळवारी सायंकाळी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची मुंबईत सुमारे दीड तास बैठक झाली.
यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना अजित पवारांनी मंत्रालयात बोलावून घेतले. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत ते पाचही नगरसेवक हजर होते. अजित पवारांनी या पाचही नगरसेवकांना नार्वेकरांकडे सोपविले. यानंतर या नगरसेवकांना मातोश्रीवर नेण्यात आले. यावेळी या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता.