वसंत मोरेंची नाराजी दूर होणार? मनसे नेते अमित ठाकरे करणार मध्यस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 01:41 PM2022-12-09T13:41:41+5:302022-12-09T14:54:12+5:30
गेल्या काही दिवसापासून मनसे नेते वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वसंत मोरे मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत.
गेल्या काही दिवसापासून मनसे नेते वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. वसंत मोरे मनसेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत, दोन दिवसापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही एका कार्यक्रमात वसंत मोरे यांना पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा या चर्चा सुरू आहेत. यावर आता मनसे नेते अमित ठाकरे मध्यस्ती करणार असल्याचे बोलले जात आहे.
मनसे नेते आज पुणे दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यादरम्यान ठाकरे यांना भेटीसाठी बोलावले आहे. त्यामुळे या भेटीत वसंत मोरे यांची नाराजी दूर होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या नाराजीच्या चर्चांवर आज पडदा पडणार असल्याचे बोलले जात आहे.
'दादा म्हणाले, वसंतराव मी वाट बघतोय'
मनसेचे नेते वसंत मोरे (MNS Vasant More) यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील एका लग्नात अजित पवारांनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे. 'तात्या, कधी येताय, वाट पाहतोय, असं म्हणत अजित पवारांनी मिश्किल भाषेत वसंत मोरेंना राष्ट्रावादीत बोलवल्याचं स्वत: वसंत मोरे यांनी सांगितलं.
वसंत मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं. त्यामध्ये मी देखील गेलो होतो. त्यावेळी नेमके माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील आले. त्यानंतर आम्ही सर्व स्टेजवर जाऊन आलो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याशी मी बोलत असताना अजित पवार तेथे आले. मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाही अजित पवारांनी मला आवाज दिला आणि माझ्या छातीवर थाप मरुन दादा म्हणाले, अरे तात्या, किती नाराज...आता या आमच्याकडे...मी वाट बघतोय, असं म्हणाले.
लग्नातून जाताना अजित पवार पुन्हा म्हणाले, वसंतराव, मी तुमची वाट बघतोय..आपल्याला भेटायचं आहे. अजित पवारांच्या या विधानवर मी हो, असं म्हटलं. मला असं वाटतं की, हा मी केलेल्या कामाचा गौरव असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं. पुणे शहरातील पक्षामधून मला डावलंल जातंय. मला लक्ष्य केलं जातंय. मला पक्षाच्या कुठल्या कार्यक्रमाला बोलावलं जात नाही. तरीसुद्धा मी कार्यक्रमाला जातो. मला स्टेजवर बसवलं जातं, मात्र भाषणासाठी वेळ दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी मी मनसेप्रमुखराज ठाकरे यांना सांगितल्या आहेत. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की, पुण्यात आल्यानंतर एक बैठक घेऊ आणि काही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.