Join us

मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयात घुसले कार्यकर्ते; जोरदार राडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:09 IST

मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. डिस्ने हॉटस्टारच्या अॅपवर क्रिकेट समालोचन मराठीत उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीचं कार्यालय गाठलं आहे.

मुंबई

मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. डिस्ने हॉटस्टारच्या अॅपवर क्रिकेट समालोचन मराठीत उपलब्ध नसल्याच्या मुद्द्यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी थेट कंपनीचं कार्यालय गाठलं आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संतोष धुरी यांनी वरळी येथील हॉटस्टारच्या कार्यालयात जाऊन निषेध नोंदवला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. 

कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भेट देत नसल्याने काही काळ वातावरण तापलं होतं. पण पोलीस फौजफाटा उपस्थित असल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. अमेय खोपकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर अॅपवर मराठीत समालोचन उपलब्ध करुन द्यावं असं ठणकावून सांगितलं. 

"महाराष्ट्रात राहून इथे व्यवसाय करुन डिस्ने हॉटस्टारच्या अॅपवर क्रिकेटचं समालोचन हिंदी, गुजराती, मल्याळी, तेलुगु, भोजपुरी या सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे. पण मराठीत उपलब्ध नाही. हे अजिबात चालणार नाही. ही समज नाही तर धमकी समजा. पण मराठीत समालोचन तातडीने उपलब्ध झालं पाहिजे. नाहीतर डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयाच्या काचा खूप महाग आहेत हे लक्षात ठेवा", असा आक्रमक पवित्रा यावेळी अमेय खोपकर यांनी घेतला. 

अधिकारी भेट देत नसल्यानं राडामनसेचे पदाधिकारी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता बराच वेळ कुणी भेटायला तयार होत नसल्याने कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. धमकीवजा इशारा दिल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना भेट दिली. यात अमेय खोपकर यांनी निवेदन देत तातडीने मराठीत समालोचन उपलब्ध करुन देण्याच्या सूचना केल्या आहेत. 

टॅग्स :मनसेमुंबईमराठी