मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी पुण्यातून आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. 5 जून रोजी आपण अयोध्येला जाणार असल्याचं राज यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तत्पूर्वी 3 मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे, मनसैनिकांकडून सध्या राज यांच्या जाहीर सभेची आणि अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे औरंगाबादच्या सभेसाठी परवानग्या घेतल्या जात आहेत. तर, दुसरीकडे अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वे बुकिंगची तयारी सुरू आहे.
‘राज तिलक की करो तैयारी आ रहे हे भगवाधारी... चलो अयोध्या..’ असा मजकूर लिहिलेले फलक ठाण्याच्या विविध भागांत मनसेकडून लावण्यात आले आहेत. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीपासून ते अयोध्येला जाण्यापर्यंत विविध योजना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केल्या आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आता येणाऱ्या महापालिका व पुढील विधानसभा निवडणुकीत आपली वाटचाल असेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यातूनच अयोध्या दौऱ्याची चर्चा चांगलीच होत आहे.
राज ठाकरे यांच्या पूर्वनियोजित अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत आणि रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची आज कार्यालया जाऊन भेट घेतली. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांशी अयोध्या दौऱ्याला जाणारे मनसेचे पदाधिकारी तसंच महाराष्ट्र सैनिकांसाठी विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध होण्याबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर 'योग्य ते सहकार्य करण्यात येईल' असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहितीने मनसेनं दिली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन फोटोही शेअर करण्यात आले आहेत.
ठाणेकरांना आठवले बाळासाहेब
हनुमान जयंतीदिवशी पुण्यात राज ठाकरे आले होते. त्यावेळी, अंगावर भगवी शाल परिधान केलेल्या राज यांनी हनुमान मंदिरात आरती केली. त्यांच्या या आरती सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर, ठाणे शहरात या फोटोसह बॅनरही झळकले. या बॅनरवरील फोटोमुळे ठाणेकरांना ३५ वर्षांपूर्वीच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाल्याचंही स्थानिकांनी म्हटलं.
हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आलेख उंचावणार का?
मनसेने यापूर्वी मराठीचा मुद्दा उचलला होता. दुकानावरील मराठी पाट्यांकरिता आंदोलने केली. मात्र, ठाण्यात मनसेला मोठे राजकीय यश मिळाले नाही. २००७ मध्ये त्यांचे तीन नगरसेवक विजयी झाले. मनसेचे १२ आमदार २००९ मध्ये विजयी झाले तेव्हा रमेश पाटील हे एकमेव आमदार ठाणे जिल्ह्यातून विजयी झाले. २०१२ मध्ये मनसेचे सात नगरसेवक ठाण्यात विजयी झाले. मात्र, त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली. आता हिंदुत्ववादी भूमिका मनसेचा राजकीय आलेख उंचावेल, अशी पक्षाला अपेक्षा आहे.