मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. मनसेचा नवा झेंडा कसा असेल याची अनेकांना उत्सुकता होती. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण करण्यात आलं. मनसेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते या अधिवेशनासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. राज ठाकरे हिंदुत्वाची वाट स्वीकारणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. अधिवेशन स्थळी चहापानापासून भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेला आक्रमक हिंदुत्वाची भूमिका अडचणीची ठरेल असा दावा केला जात आहे. याच गृहितकातून मनसेने हिंदुत्वाची कास धरत हिंदुत्ववादी शिवसैनिकांना साद घालण्यास सुरुवात केली आहे.
बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेक्समध्ये मनसेने महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे. या अधिवेशनात राज ठाकरेंनी आपल्या झेंड्याचं अनावरण केलं. त्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. पक्ष स्थापन झाल्यानंतर आपल्या अनेक संघटना स्थापन झाल्या, प्रत्येक संघटनेनं उल्लेखनीय अशी कामं केलेली आहेत.
पक्ष फक्त 13 वर्षांचा आहे, पण जनतेच्या राज ठाकरे आणि आपल्याकडून प्रचंड जास्ती अपेक्षा आहेत. मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीसाठी 100हून अधिक केसेस राज ठाकरेंनी अंगावर घेतल्या आहेत. कुठल्याही विषयावर राज ठाकरेंनी नेहमीच कठोर भूमिका घेतलेली आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आपले सण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच निडरपणे साजरे झाले. आजवर पक्षाने अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनेक निर्भीड राजकीय भूमिका घेतल्या, तडफेने आंदोलनं केली. जेट कर्मचाऱ्यांना न्याय देणारं आंदोलन, मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान चित्रपटगृहांत मिळवून दिलं, आझाद मैदानावर धर्मांधांनी जेव्हा धुडगूस घातला, तेव्हा बेधडकपणे आपण मोर्च्याने त्याला उत्तर दिलं होतं, असं म्हणत अभ्यंकर यांनी राज ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली होती.
महत्त्वाच्या बातम्या
मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी
''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"
मनसे महाअधिवेशन : नवीन झेंडा घेऊ हाती...