मुंबई- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सामना हे दैनिक वृत्तपत्र सुरु करुन एक चळवळ सुरु केली होती. मात्र बाळासाहेबांची ही चळवळ संपवून आता फक्त ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांची वळवळ राहिलेली आहे, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
संदीप देशपांडे यांनी यावेळी आगामी मनसेच्या मेळाव्याबाबतही माहिती दिली. २७ नोव्हेंबर रोजी नेस्कोला दुपारी ४ वाजता गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं. तसेच २७ तारखेला जो काही राजकारणातला गढुळपणा आहे, त्यावर तुरटी फिरवण्याचे काम राज ठाकरे करतील. प्रत्येकाचा हिशोब हा २७ नोव्हेंबरला होईल, असा दावाही संदीप देशपांडे यांनी यावेळी केला.
राज ठाकरे यांच्या उत्तर मुंबईतील मागाठाणे आणि चारकोप विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिक मतदार निर्णायक भूमिका बजावतात. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या किमान ७-८ नेत्यांनी निवडणूक जिंकून नगरसेवक व्हावे. स्थानिक पातळीवर मनसेच्या नेत्यांकडून या प्रकाराची व्यूहरचना केली जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा- शिंदे सेना व मनसे अशी युती होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच राज ठाकरे यांनी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची भूमिका शिंदे, फडणवीस यांनी घेतल्याचे अलीकडे दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मसनेप्रमुख राज ठाकरे यांची सरकार स्थापन झाल्यापासून अनेकवेळा भेटीगाठी होत आहे. त्यामुळे शिंदे गट, भाजपा आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली आहे.
मनसेकडे अनेक प्रभागात चांगले उमेदवार नाही. त्यामुळे त्यांचा वापर ठाकरे गटाची मतं फोडण्यासाठी करता येईल, असा भाजपाचा प्लॅन आहे. तसेच ज्या जागांवर मनसेचं वर्चस्व आहे, असा जागांवर भाजपाकडून उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे याचा राज ठाकरेंना फायदा होणार की तोटा, हे आगामी काळातच समोर येईल.
मुंबई मनपात मनसेची कामगिरी-
२००७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेने पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि ७ जागा जिंकल्या. त्यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीत २७ जागा आणि २०१७ च्या निवडणुकीत फक्त ७ जागा जिंकल्या होत्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"