महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवशी राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. आजही त्यांच्या निवासस्थानाबाहेर सकाळपासूनच प्रचंड गर्दी झाली होती. प्रत्येकाला भेटता यावं याकरता राज ठाकरेंनी देखील खास वेळ बाजुला काढून ठेवला होता. पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवतीर्थावर भेटण्यासाठी आले होते.
मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज ठाकरेंना राजू पाटलांनी एक खास गिफ्ट दिलं. याबाबत ट्विट करत राजू पाटील यांनी माहिती दिली. राजू पाटील म्हणाले की, आम्हा तमाम मनसैनिकांचे दैवत आणि महाराष्ट्राचे भाग्यविधाते, हिंदूधर्माभिमानी राज ठाकरे यांचा वाढदिवस म्हणजे आम्हा महाराष्ट्रसैनिकांसाठी सोहळाच. आज राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवतीर्थ येथे भेट घेत श्रीरामजन्मभूमी अयोध्या नगरीत साकार होत असलेल्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट दिली. तसेच रामरायांच्या कृपेने आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या नेतृत्वात महाराष्ट्रात रामराज्य येवो अशा शुभेच्छा दिल्या, असं राजू पाटील यावेळी म्हणाले.
माझा नातू आजारी, आरडाओरड करू नका-
घराबाहेर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी प्रेमाने फटकारले. आवाज करू नका, जास्ती आरडाओरडा करू नका. माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी ही माहिती दिल्यानंतर कार्यकर्तेही शांत झाले.
भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर-
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाच्या बाहेरील रस्त्यावर बॅरिकेट लावण्यात आलेत. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादरच्या सर्व भागांमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. “भावी मुख्यमंत्री” असा उल्लेख असलेले बॅनर कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आले आहेत.