...म्हणून तुमची अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते; मनसे आमदाराचा धनंजय मुंडेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 02:17 PM2022-04-20T14:17:02+5:302022-04-20T14:17:44+5:30

चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला झालेल्या धनुर्वातातून तर ही प्रतिक्रिया आली नाही ना? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे.

MNS MLA Raju Patil criticized Minister Dhananjay Munde | ...म्हणून तुमची अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते; मनसे आमदाराचा धनंजय मुंडेंना टोला

...म्हणून तुमची अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते; मनसे आमदाराचा धनंजय मुंडेंना टोला

googlenewsNext

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा थेट आरोप केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीविरुद्ध मनसे असा सामना पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर मंत्री धनंजय मुंडे यांनी जहरी टीका केली. राज ठाकरे हे भाजपाचे अर्धवटराव आहेत. त्यामुळे ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले असा टोला मुंडे यांनी लगावला. त्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे.

मनसे आमदार राजू पाटील म्हणाले की, धनंजयराव, चौकश्यांचा गंजलेला खिळा घुसल्यामुळे तुम्हाला झालेल्या धनुर्वातातून तर ही प्रतिक्रिया आली नाही ना? तुमच्या बुडाखाली काय जळतंय व टोचतंय याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे वायफळ बडबडीचा राग जरी येत असला तरी तुमची अशी अवस्था पाहून ‘करूणा’च अधिक येते असं सांगत त्यांनी धनंजय मुंडेंवर बोचरी टीका केली आहे.

 तर धनंजय मुंडे(Dhananjay Munde) म्हणजे राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग आहेत. आयुष्यात इतकं डार्लिंग, डार्लिंग केलंय की, तिच डार्लिंग आता अंगाशी आलीय. छातीच कळ उगाच येते का? असा सवाल करत मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी धनंजय मुंडेंवर प्रहार केला आहे. तर दुसरीकडे मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनीही धनंजय मुंडेंवर निशाणा साधत म्हटलंय की, अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीत फोन स्विच ऑफ करून बसले, पवारांनी डोळे वटारल्यानंतर अर्धवट आंघोळ करून साहेब माफ करा म्हणून विनवणी करू लागले. मनासारखं खातं मिळालं नाही असं आजही दबक्या आवाजात बोलत असतात. असे हे मुंगेरीलाल राज ठाकरेंवर टीका करतायेत असं त्यांनी सांगितले.

काय म्हणाले होते धनंजय मुंडे?

राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेच्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हणाले की, पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपाच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे. अर्धवटराव आधी भाजपाविरोधात बोलायचे. सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

Web Title: MNS MLA Raju Patil criticized Minister Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.