मुंबई: मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं आत्तापासूनच तयारी केली आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपामनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चां जोर धरु लागल्या आहेत. या चर्चा असतानाच भाजपा आणि मनसेच्या आमदारांमध्ये जुंपल्याचे दिसून येत आहे.
भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी अजून तरी भाजपा-मनसे युतीची बातचीत झालेली नाही. आम्ही एकट्याच्या जीवावरच इतिहास घडवणार आहोत, असं विधान आशिष शेलार यांनी केलं होतं. आशिष शेलार यांच्या या वक्तव्यानंतर मनसेने देखील प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कुठे त्यांना विचारायला गेलो आहे की आम्हाला युतीत घ्या?, उगीचंच काहीतरी झगा मगा आणि माझ्याकडे बघा. आम्ही विचारायला आलो तर प्रतिक्रिया द्या ना,' असं म्हणत राजू पाटील यांनी आशिष शेलार यांना फटकारलं आहे.
मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता. मनसेची उत्तर भारतीयांविरोधाची भूमिका मवाळ झाली तर पुढचा विचार होऊ शकेल, असंही भाजपकडून विधान करण्यात आलं होतं. आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानं ही मनसे आणि भाजपच्या युतीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना- भाजपा युती तुटल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादीला सोबत घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजपनं मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपा आणि मनसेची युती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे अयोध्या दौरा करणार-
राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी दिली आहे. येत्या 1 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतं. मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. याचदरम्यान राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
23 जानेवारी 2020 रोजी मनसेने आपला झेंडा बदलला, तो भगवा झाला. मनसेने हिंदुत्त्वाची कास धरली. पक्षाच्या झेंड्यातील बदल आणि मनसेची मराठीच्या मुद्द्यासह हिंदुत्त्वाची स्वीकारलेली भूमिका यामुळे राज ठाकरे अयोध्या वारी करणार का असा प्रश्न वारंवार विचारण्यात येत होते. या प्रश्नांची उत्तर देण्याची तयारी पक्षाने सुरु केल्याचं समजतं. बाळा नांदगावकर यांच्या माहितीनुसार, राज ठाकरे 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येचा दौरा करणार आहेत. 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन असतो. अयोध्या दौऱ्याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करतील. तर 9 मार्चनंतर महिनाभर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं.