मुंबई- आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात, असं म्हणत ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
सुषमा अंधारेंच्या या टीकेला आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. 'वरचा मजला रिकामा' असा मराठीत वाक्प्रचार आहे,परंतु आमच्याकडे एक सुशी ताई आहेत ज्यांच्या 'वरच्या मजल्यावर' घनदाट 'अंधार' आहे. आपण कधीकाळी कुणाविषयी काय बोललो होतो, हे त्यांना बिलकुल आठवत नाही.आणि त्याच अंधारामुळे त्या वाट्टेल ते बरळत असतात, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेत शिंदे-ठाकरे गट असे गट निर्माण झाले. त्यात शिवसेनेच्या तब्बल ४० आमदार आणि १३ खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. या राजकीय वादंगात उद्धव ठाकरे एकाकी पडले असताना राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु राज ठाकरेंनी थेट भाजपा-शिंदे गटाशी जवळीक साधली. त्यामुळे शिवसेना उबाठा गट आणि मनसे यांच्यात आणखी दरी निर्माण झाली.