मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकाम कामांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला. आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुलेट ट्रेनला अनेक स्तरावरुन विरोध करण्यात येत आहे. मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर निशाणा साधला होता. त्यातच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आता यू- टर्न नको, हिच ती वेळ म्हणत मुख्यमंत्र्यांकडे बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळायची मागणी केली आहे.
राजू पाटील ट्विट करत म्हणाले की, बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारला द्यावा लागणारा हिस्सा व त्यासाठी बीकेसी व इतर ठिकाणी भूसंपादीत करायला लागणाऱ्या हजारो कोटी राज्याच्या इतर लोकोपयोगी कामांसाठी वापरण्याची विनंती केली आहे.
मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला कामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी सांगितले की, बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत आढावा देण्याचे आदेश दिले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील अनेक शेतकरी आणि आदिवासी यांचा विरोध आहे. जमिन अधिग्रहण करण्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हे सरकार सर्वसामान्य माणसांचे आहे. असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दरम्यान बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग होणार आहे, असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. ह्या बुलेट ट्रेनसाठी आदिवासींच्या जमिनी घेतल्या जात आहेत, कशासाठी?, ह्या बुलेट ट्रेनचा कोणाला उपयोग आहे?, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जखम पुन्हा जिवंत करायचा हा प्रयत्न आहे का?, असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. तसेच जपानकडून कर्ज घेऊन 1 लाख 10 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी उभारताय? काकोडकर समितीचा अहवाल आहे की देशातील रेल्वेचं जाळं सुधारायला फक्त 1 लक्ष कोटींची गरज आहे, त्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत पण निरुपयोगी बुलेट ट्रेनसाठी पैसे आहेत?, असं म्हणत मोदींच्या बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली होती.