मुंबई: संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा आज आरंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोहिमेचे उद्घाटन करणार आहेत. यासाठी शहरांसह जिल्हा आणि ग्रामपातळीवरील लसीकरण केंद्रे सज्ज झाली आहे. दोन लसींचा वापर या मोहिमेत केला जाणार आहे.
महाराष्ट्रात मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यातुलनेत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राला ९ लाख ६३ हजार लसी पुरविण्यात आल्या आहेत. राज्याची परिस्थिती पाहता आणखी लसींची मागणी करण्यात आली आहे. राज्यात ८ लाख जणांना पहिल्या टप्प्यात लस टोचण्यात येणार आहे. त्यासाठी ५११ केंद्रे सज्ज झाली आहेत. याचपार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली आहे.
राजू पाटील ट्विटरद्वारे म्हणाले की, उद्धव ठाकरेजी आजपासून महाराष्ट्रा सोबतच देशात पण कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे आता तरी सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा चालू करा. नोकरीसाठी मुंबईकडे धावणारा मध्यमवर्ग आपली अर्धी कमाई प्रवासावर खर्च करून व वाहतूक कोंडीत रोज रोज अडकून थकला आहे, असं राजू पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल मर्यादित घटकांसाठी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या नऊ महिन्यांपासून लोकल बंद आहे. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवावगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
नियमित रेल्वे फेऱ्यांच्या तुलनेत आता उपनगरीय रेल्वेच्या ९० टक्के फेऱ्या होत आहेत. १० टक्के फेऱ्या वाढविण्यास वेळ लागणार नाही. रेल्वेची पूर्ण तयारी आहे. सरकारच्या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून लोकल सुरू होतील. मात्र प्रश्न गर्दीचा आहे. सर्वांसाठी रेल्वे सुरू झाल्यास गर्दी मोठ्या प्रमाणात वाढेल. त्याला आवर घालणे सोपे नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी करण्यात आली, मात्र सर्वांसाठी रेल्वे सुरू केल्यास गर्दीतून कोरोनाचा अधिक प्रसार होऊ शकतो त्याचाही विचार व्हावा, असे रेल्वेचे म्हणणे आहे.
...त्यानुसार उचलणार पुढचे पाऊल
सर्वांसाठी रेल्वे सुरू करण्याबाबत राज्य सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांची चर्चा सुरू आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता सरकार तात्काळ रेल्वे सुरू करेल याची शक्यता कमी आहे. रेल्वेने वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. सरकारचा निर्णय आल्यानंतर त्यानुसार पुढील पाऊल उचलले जाईल. - वरिष्ठ रेल्वे अधिकारी, पश्चिम रेल्वे