Join us

मनसे, भाजपाची युती होणार?; राजू पाटील यांनी केलं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 4:05 PM

भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे पक्षाच्या झेंड्याचा रंग बदलणार असल्याची चर्चा सुरु असतानाच भाजपा आणि मनसे भविष्यात एकत्र येणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच मंगळवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीनंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगत भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले होते. तसेच मनसेचे संदीप देशपांडे यांनी देखील राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली केली होती भाजपा पक्षावर नाही असं मत व्यक्त केलं होतं. 

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील मनसे आणि भाजपा एकत्र येऊ शकतात असं मत व्यक्त केलं आहे. राजू पाटील म्हणाले की, सभागृहातील सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात मनसे आणि भाजपामध्ये युती होऊ शकते. परंतु राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली याची कल्पना नसल्याचे देखील राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.

मनसे-भाजपा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा

भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंशी भेट ही राजकीय नाही तर सदिच्छा भेट होती पण भविष्यात काहीही घडू शकतं असं मत व्यक्त केलं आहे. तसेच राज्यातील बदलेली सत्तासमीकरणं पाहता कालपर्यंत शिवसेना काँग्रेससोबत जाईल का असं कोणी म्हटलं तर वेडं म्हटलं असतं. पण शेवटी ते एकत्र झालेच नाही. त्यामुळे महाराष्ट्र धर्माचा जो मूळ विचार आहे त्यावर चर्चा झाली आहे भविष्यात काहीही होऊ शकतं असे त्यांनी संकेत दिले आहेत. 

राज-फडणवीस भेटीवरुन भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवारांचे नवे राजकीय संकेत; म्हणाले की...

दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे.

टॅग्स :राज ठाकरेराजू पाटीलमहाराष्ट्र सरकारमनसेदेवेंद्र फडणवीसभाजपासुधीर मुनगंटीवार