'...तर मी स्वत: तुमच्या स्वागतासाठी उभा राहतो'; राजू पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 04:36 PM2020-08-24T16:36:29+5:302020-08-24T16:36:36+5:30
उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले.
मुंबई: मिशन बिगेन अगेनमुळे आता कुठे रस्त्यांवर वाहने धावू लागली आहेत. मात्र, पावसामुळे खड्डे पडल्याने रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजू पाटील ट्विट करत म्हणाले की, उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो, असं म्हणत राजू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
@OfficeofUT जी ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील,पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो .@mieknathshinde@CMOMaharashtrapic.twitter.com/FrjkFsHfTy
— Raju Patil (@rajupatilmanase) August 24, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने लोकलसेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिवहनसेवेच्या बस, रिक्षा, टॅक्सी, स्वत:ची दुचाकी, चारचाकी घेऊन नोकरदारवर्ग मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कर्जत, कसारा, भिवंडी, ठाणे व मीरा-भाईंदरपर्यंत प्रवास करीत आहे. तेथे जाण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांना शीळ-कल्याण-भिवंडी या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. मात्र, या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच, या रस्त्याचे सहापदरी रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
डोंबिवली एमआयडीसी परिसर, मानपाडा रस्त्यावर काही ठिकाणी तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही खड्डे पडलेले आहेत. एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण झाली असून, त्याकडे एमआयडीसी व के डीएमसीचे दुर्लक्ष झाले आहे. खड्डे त्वरित बुजविले जातील, असे आश्वासन महापालिका व एमआयडीसीकडून दिले जात आहे. कल्याण पूर्व-पश्चिमेतील डांबरी रस्त्यांवरही खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट आहे.
केडीएमसीने खड्डे बुजवण्यासाठी १७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मागच्या वर्षीही १७ कोटी खर्च झाले होते. मात्र, किती खड्डे बुजविले, याचा हिशेब मनपाने अद्याप दिलेला नाही. दरवर्षी खड्डे बुजविण्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. असे असतानाही नागरिकांना पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांतून प्रवास करावा लागतो. प्रसंगी अपघाताला तोंड द्यावे लागते. काही वेळेस जीव गमाविण्याची वेळ येते.