Join us

मराठी ठेकेदारांची बाजू घेत मनसेचे आंदोलन

By admin | Published: February 01, 2016 1:58 AM

मराठी माणसाचा कैवार घेत मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने अमराठी ठेकेदाराची बाजू घेण्याच्या घाटकोपर येथील एन वॉर्डातील प्रकारानंतर हा वाद

मुंबई : मराठी माणसाचा कैवार घेत मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेने अमराठी ठेकेदाराची बाजू घेण्याच्या घाटकोपर येथील एन वॉर्डातील प्रकारानंतर हा वाद आता शहर आणि उपनगरांतील अन्य प्रभागांमध्ये पसरण्याची शक्यता आहे. बेरोजगार मराठी ठेकेदारांना कामे मिळावीत यासाठी घाटकोपर येथे मनसेतर्फे निदर्शनेही करण्यात आली. महापालिका अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून कागदोपत्री कामे मंजूर करण्याचा पायंडा ठेकेदारांच्या एका लॉबीने पाडला आहे. गेल्या आठवड्यात मराठी बेरोजगार अभियंत्याला काम मिळावे म्हणून घाटकोपर मनसे विभागप्रमुख परमेश्वर कदम यांनी एका बिगरमराठी कंपनीविरोधात आंदोलन छेडले आहे. काही दिवसांपूर्वी दहिसर येथील सूरज देवरा यांनी घाटकोपर एन विभागात निविदा भरली होती. त्याला मनसे विभागप्रमुख परमेश्वर कदम यांनी विरोध केला. देवरा यांच्या अनेक कंपन्या असून, ते कोट्यवधींची कामे करतात. त्यांनी किरकोळ कामांच्या निविदा भरू नयेत, ती बेरोजगार अमराठी अभियंत्यांना मिळावीत, अशी भूमिका कदम यांनी मांडली. ठेकेदार देवरा हे निविदेचे चलन भरण्यासाठी एन विभागात आले असता मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना चोप दिला. मनसेचा विरोध लक्षात घेत देवरा यांनी चक्क स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख संजय गायकवाड यांनाच अधिकारपत्र देऊन चलन भरण्यास पाठवले. कोणत्याही परिस्थितीत देवरा यांना चलन भरू न देण्याचा निर्धार मनसे पदाधिकाऱ्यांनी केला होता, तर अमराठी ठेकेदाराचे चलन भरणारच असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. हा वाद चिघळल्याने दोन्ही गटांत तणाव निर्माण झाल्याने एन विभाग कार्यालयात पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला. परमेश्वर कदम यांनी ते चलन फाडून टाकले. दरम्यान, स्थानिक रहिवाशीही आता या मुद्द्यावर जागे झाले असून, कोणत्याही स्थितीत परप्रांतीय ठेकेदाराला काम करू देणार नाही. वेळप्रसंगी आम्हीच श्रमदान करून आमच्या विभागाचा विकास करू, असा निर्धार सम्राट अशोक चाळ परिसरातील रहिवाशांनी घेतला आहे. त्यानंतर एन विभागाबाहेर निदर्शनेही करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपर्यंत सिव्हिल वर्क्स कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने बेरोजगार अभियंत्यांना प्रत्येक वॉर्डात पाच टक्के निविदा राखीव होत्या. त्यांच्या निविदा न भरता चिठ्ठीद्वारे कामांचे वाटप केले जायचे. तीही पद्धत अमराठी ठेकेदारांनी बंद पाडल्याचा गौप्यस्फोट परमेश्वर कदम यांनी केला. मराठी बेरोजगार युवकांसाठी आम्ही केलेले आंदोलन यापुढे संपूर्ण मुंबईभर करणार आहोत, अशी प्रतिक्रिया परमेश्वर कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)