मुंबई - कोहिनूर मिल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांची ईडीने तब्बल साडेआठ तास चौकशी केली. मात्र ईडीने राज ठाकरेंना पाठविलेल्या नोटीसनंतर आता चक्क मनसेनेच ईडीला नोटीस पाठवली आहे.
मनसेने यासंर्दभात ट्विट करत म्हणटले की, अंमलबजावणी संचलनायनाच्या कार्यालयाच्या नावाचे फलक हिंदीत असल्याने महाराष्टात शासकीय फलक मराठीतच असायला पाहिजे, तसेच यासंबंधीत तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून त्या नोटीसाची प्रत ईडीला पाठवली आहे. त्याचप्रमाणे आता मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार का? असा प्रश्नही मनसेने उपस्थित केला आहे.
मनसेने याआधीही महाराष्ट्रात दुकानांच्या नावाचे फलक मराठीत हवे यासाठी अनेकदा आंदोलन देखील केले होते. त्यामुळे आता नोटीस पाठवणाऱ्या ईडीलाच मनसेने नोटीस पाठवून, मराठीत फलक लावण्याची मागणी केल्याने मनसे पुढे कोणती भुमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
कोहिनूर मिल गैरव्यवहार प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची गुरुवारी ईडीने तब्बल साडेआठ तास चौकशी केली. सकाळी 11.30 वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरु झाली होती. राज ठाकरेंनी ईडीच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य केल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तर चौकशीनंतर रात्री 8.15 च्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले. त्यानंतर कुटुंबासह राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले. त्यावेळी घराबाहेर अनेक मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. या उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी सांगितलं की, ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. अशा कितीही चौकशी लावल्या तरीही माझं तोंड बंद ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली.