मुंबई : मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारला असला तरी मराठीचा मुद्दाही प्रखरपणे लावून धरण्याच्या सूचना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या आहेत. हिंदुत्वासह मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, अशी सूचना ठाकरे यांनी केल्या आहेत.
गुढीपाडव्याचा मनसे मेळावा आणि तिथीनुसार शिवजयंती साजरी करणे आदी पार्श्वभूमीवर सोमवारी राज ठाकरे यांनी वांद्रे येथे पक्षाची बैठक घेतली. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांना सांगितले की, मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. महिलांनी या जयंतीत मोठ्या संख्येने भाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा होतो. कोरोनामुळे दोन वर्षे हा मेळावा झाला नव्हता. यावर्षी २ एप्रिलला मेळावा होईल.पालिका निवडणुका कधी होणार याची कल्पना नसली तरी कधीही निवडणुका होऊ शकतात हे गृहीत धरून निवडणुकांची तयारी ताकदीने करायची आहे, असे नांदगावकर म्हणाले.