Join us

मनसेची टोलमुक्ती ठरली क्षणिक! कार्यकर्ते निघून जाताच पुन्हा टोलवसुली सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 12:27 PM

आजपासून सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्टयांमुळे  मुंबई बाहेर जाणा-या सर्वच टोल नाक्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे.

ठळक मुद्देशनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळची सुट्टी आहे त्यामुळे पुढचे चार दिवस टोल वसुली करु नये असे पत्र मनसे कार्यकर्त्यांनी टोल वसुली करणा-या कंपनीला दिले आहे. नाशिक, कोकण, पुण्याच्या दिशेने जाणा-या सर्वच टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  

मुंबई -  मनसे कार्यकर्ते निघून जाताच पुन्हा एकदा ऐरोली टोल नाक्यावर टोल वसुली सुरु झाली आहे. मुंबई बाहेर जाणा-या सर्वच टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याच्या बातम्या आल्यानंतर मनसे कार्यकर्ते शनिवारी सकाळी मुलुंड-ऐरोली टोल नाक्यावर पोहोचले व टोल वसुली बंद पाडली. मनसे कार्यकर्त्यांनी स्वत: टोल नाक्यांवर उभे राहून वाहतूक कोंडी फोडली व टोल न घेता गाडया सोडल्या. पोलीस दाखल झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. त्यानंतर पुन्हा एकदा टोल वसुली सुरु झाली आहे. 

शनिवार, रविवार आणि सोमवारी नाताळची सुट्टी आहे त्यामुळे पुढचे चार दिवस टोल वसुली करु नये असे पत्र मनसे कार्यकर्त्यांनी टोल वसुली करणा-या कंपनीला दिले आहे. आजपासून सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्टयांमुळे  मुंबई बाहेर जाणा-या सर्वच टोल नाक्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. विकेण्ड सेलिब्रेट करण्यासाठी शुक्रवारपासून मुंबईकर मोठया संख्येने शहराबाहेर जात आहेत. त्यामुळे कालपासूनच टोल नाक्यांवर  वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. 

नाशिक, कोकण, पुण्याच्या दिशेने जाणा-या सर्वच टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.  

मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. खंडाळा घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली असून गाड्या शेडुंग फाट्यावरुन वळवण्यात आल्या आहेत. तसंच अवजड वाहनांची वाहतूक जुन्या हायवेवरुन वळवण्यात आली आहे. खालापूर टोलनाक्यावर जवळपास चार किमी लांब रांगा लागल्या आहेत. टोलनाक्यावर गाड्यांची रांग लागली असल्या कारणाने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई - नाशिक हायवेवरील वाहतूकही मंदावली आहे.

फक्त मुंबई -पुणे नाही तर मुंबई - गोवा आणि अहमदाबाद हायवेवरही वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबई - गोवा हायवेवर पेणजवळ प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. कोकणात जाणा-या रस्त्यांवर गाड्यांच्या चार ते पाच किमी लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई - अहमदाबाद हायवेवरही हीच परिस्थिती आहे.                                               

टॅग्स :मनसे