नवी मुंबई : पक्षांतर्गत वादातून मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मारामारीची घटना शुक्र वारी रात्री घडली. पक्षाच्या जिल्हा संपर्क अध्यक्षाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा प्रकार घडल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेतील दुफळी दिसून आली. मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन अनेक पदाधिकारी सध्या आपल्या पदाचे राजीनामे देत आहेत. यासंदर्भातल्या चौकशीकरिता शुक्र वारी रात्री नेरूळ येथे पदाधिकाऱ्यांची एक बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला मनसेचे ठाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष गिरीश धानुरकर हे उपस्थित होते. या बैठकीत आणखी काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर केले. त्यामुळे बैठक सुरू होताच बैठकीत देखील पाच ते सहा जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे बैठकीतील वातावरण तापले.यावेळी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही मनसे पदाधिकाऱ्यानी इतर पक्षांकडून पैसे घेवून पक्षविरोधी काम केल्याचा आरोप यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी केला. यावरून मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे आणि उपशहर अध्यक्ष निलेश बानखिले यांच्यात शाब्दिक वाद झाला. क्षणातच या वादाला फाटा फुटत बानखिले यांनी गलुगडे यांच्या श्रीमुखात लगावून दिल्या. त्यामुळे मनसेच्या बैठकीला आखाड्याचे रूप प्राप्त झाले होते. त्यानंतर देखील हा वाद वैयक्तिक स्तरावर चिघळला होता. बैठकीत झालेल्या वादानंतर बानखिले हे आपल्या साथीदारांसह आपल्याला मारण्यासाठी घरापर्यंत पोचले होते असे गलुगडे यांचे म्हणणे आहे. केवळ पक्ष वरिष्ठानी सुचवल्यामुळे आपण त्यांच्याविरोधात पोलिस तक्र ार केली नसल्याचे देखील ते म्हणाले. बानखिले यांनीही बैठकीत झालेल्या वादाला दुजोरा देत या गोष्टी पक्षांतर्गत असल्याचे सांगत अधिक चर्चा टाळली. तर गलुगडे यांच्या घरी आपण त्यांची प्रेमाची भेट घेण्यासाठी गेलो होतो असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी धानुरकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
मनसेच्या पदाधिकाऱ्यांत हाणामारी
By admin | Published: June 15, 2014 1:27 AM