मुंबई : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातून विजयी झालेले मनसेचे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी शुक्रवारी ‘कृष्णकुंज’वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मनसे नेत्यांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकमधील मनसे उमेदवारही उपस्थित होते. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पाटील यांच्यासह पक्षाच्या अन्य उमेदवारांचे औक्षण करून त्यांचे अभिनंदन केले.
मनसेने राज्यात १०५ जागा लढविल्या होत्या. स्वत: राज ठाकरे यांनी वीसहून अधिक प्रचारसभा घेत मतदारांना साकडे घातले होते. सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर निशाणा साधताना सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला संधी देण्याचे आवाहन राज यांनी आपल्या सभांमधून केले. राज यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी केवळ कल्याण ग्रामीणमध्येच मनसेचे इंजिन विजयी ठरले. येथून पाटील यांनी शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. पाटील यांच्या सोशल मीडियातील प्रचारही प्रभावी ठरला.
प्रमोद पाटील यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी शर्मिला ठाकरे यांनी पाटील यांचे औक्षण करून विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. औक्षणाच्या वेळी कुठे बसायचे, यासाठी प्रमोद पाटील जागा पाहत होते. तेव्हा राज यांनी पाटील यांचा हात धरून त्यांना आपल्या खुर्चीवर बसण्यास सांगितले. त्यामुळे पाटील थोडेसे अवघडले. राज यांनी ‘बैस रे’ म्हटले, तरी पाटील यांनी नम्रपणे त्याला नकार देत राज यांच्या खुर्चीला लागून असलेल्या स्टूलवर बसणे पसंत केले. त्यानंतर शर्मिला यांनी त्यांचे औक्षण केले.
सोबतच, अन्य उमेदवारांचेही औक्षण केले. मात्र, राज यांचा प्रेमळ आग्रह आणि पाटील यांचा विनम्र नकाराचा व्हिडीओ सोशल मीडियातील मनसे समर्थकांची दाद मिळवून गेला. यावेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई यांच्यासह उमेदवार संदीप देशपांडे, नयन कदम यांच्यासह मुंबई, ठाणे, नाशिकचे बहुतांश उमेदवार उपस्थित होते. पुण्यातील उमेदवारांना मात्र राज ठाकरे स्वत: पुण्यातील पुढील दौऱ्यात भेटणार असल्याचे समजते.