Join us

मनसेची ऑनलाइन नोंदणी सात लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑनलाइन सदस्य नोंदणी मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सात लाखांहून अधिक नागरिकांनी पक्षाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑनलाइन सदस्य नोंदणी मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सात लाखांहून अधिक नागरिकांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. तर, तब्बल ६० ते ६५ लाख लोकांनी या हायटेक नोंदणी प्रक्रियेसाठी बनविण्यात आलेल्या संकेतस्थळाला भेट दिल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्येक पक्षाला सदस्य नोंदणी आणि संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पार पाडावी लागते. मात्र, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरव मनसेत सध्या संघटनात्मक बांधणीचे काम सुरू आहे. त्यातच यंदा ऑनलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत १४ मार्चला नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली. ऑनलाइन सदस्य नोंदणीसाठी तीन पर्याय देण्यात आले होते. यात, मोबाइलवर क्यूआर कोड स्कॅन करून, संकेत स्थळावर जाऊन किंवा मोबाइल नंबरवर मिस् कॉल देऊन सदस्यत्व घेता येणार आहे. पहिल्याच दिवशी दोन लाख कार्यकर्त्यांनी सदस्यत्व घेतले होते. त्यानंतर आता ही संख्या सात लाखांच्या घरात पोहोचली आहे. याशिवाय, या ऑनलाइन प्रणालीला साधारण ६५ लाख लोकांनी भेट दिली आहे, आपली इच्छा व्यक्त केली आहे. सध्या उत्सवाचा काळ आणि आर्थिक वर्ष संपत आल्याने त्याची लगबग अशा कारणांमुळे नोंदणी प्रक्रिया काहीशी मंदावली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा ऑनलाइन मोहिमेला गती दिली जाणार असल्याचे मनसेच्या नेत्याने सांगितले. सोशल मीडियातील पक्षाचे पेज, अकाउंट, महत्त्वाच्या नेत्यांचे पेज आणि अकाउंटच्या माध्यमातून नोंदणीची माहिती दिली जाईल. नेते, पदाधिकाऱ्यांसह पक्ष संघटनेच्या माध्यमातूनही या प्रक्रियेला गती दिली जाणार असल्याचे या कामाशी निगडित नेत्याने सांगितले. अगदी नैसर्गिक पद्धतीनेसुद्धा ३५ लाखांपर्यंत सहज नोंदणी शक्य आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यात आम्ही या कामाला गती देणार आहोत त्यामुळे नक्कीच मोठ्या प्रमाणावर नोंदणी होईल, असा विश्वास या नेत्याने व्यक्त केला.

२४ एप्रिलपर्यंत नोंदणी मोहीम चालणार आहे. ऑनलाइन पद्धतीसोबतच नेहमीच्या ऑफलाइन पद्धतीनेही नोंदणी सुरूच आहे. पक्षाच्या शाखांवर रीतसर अर्ज भरूनही मनसेचे सदस्यत्व घेता येते. ही प्रक्रिया समांतर चालूच आहे. त्याबाबतची आकडेवारी अद्याप एकत्रित केलेली नाही. २४ एप्रिलनंतर विभागवार त्याची आकडेवारी जमा केली जाणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.