'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 01:06 AM2020-01-26T01:06:34+5:302020-01-26T06:50:42+5:30

'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये.'

mns opposed padmashree award of singer adnan sami | 'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

Next

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारच्यावतीनं पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी कला क्षेत्रातून ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांच्यासह गायक अदनान सामीला देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शविला आहे. 

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे. याशिवाय, 2015 मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

याचबरोबर, मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये. हे मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मागणीही अमेय खोपकर यांनी केली आहे. 

दुसरीकडे, अदनान सामीने ट्विट करून पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सरकारचे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 7 जणांना पद्म विभूषण, 16 जणांना पद्म भूषण तर 118 जणांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी दिवंगत भाजप नेते अरुण जेटली, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, माजी रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर), मुष्टियोद्धा मेरी कोम आणि मॉरिशसचे अनिरुद्ध जगन्नाथ यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

दिवंगत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), उद्योजक आनंद महिंद्रा, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांना पद्मभूषण सन्मान जाहीर झाला. तर महाराष्ट्रातून बीजमाता राहीबाई पोपेरे, क्रिकेटपटू झहीर खान, आदर्श सरपंच पोपटराव पवार, माजी राज्यपाल एस.सी जमीर, निर्माती एकता कपूर, मुस्लीम सत्यशोधक मंचाचे सय्यदभाई व विख्यात गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.

Web Title: mns opposed padmashree award of singer adnan sami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.