पालिकेच्या क्रीडा भवनाची जागा महापौर निवासस्थानाला देण्यास मनसेचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 07:44 PM2018-10-11T19:44:03+5:302018-10-11T19:44:13+5:30
मलबार हिल येथील जल अभियंता खात्याचा बंगला सोडण्यास सनदी अधिकारी दाम्पत्य तयार नसल्याने आता दादर पश्चिम, शिवाजी पार्क येथीलमहापालिकेचे क्रीडा भवन महापौर निवासासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
मुंबई - मलबार हिल येथील जल अभियंता खात्याचा बंगला सोडण्यास सनदी अधिकारी दाम्पत्य तयार नसल्याने आता दादर पश्चिम, शिवाजी पार्क येथीलमहापालिकेचे क्रीडा भवन महापौर निवासासाठी आरक्षित करण्यात आले आहे. मात्र यावर आक्षेप घेत क्रीडा भवनाच्या जागेवर महापौर निवास होऊ देणार नाही,असा सक्त इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिला आहे. त्यामुळे महापौर निवासावरुन शिवसेना-मनसेत नव्या वादाला तोंड फुटले आहे.
दादर पश्चिम येथील महापाैर बंगल्यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे सनदी अधिकारी प्रवीण आणि पल्लवी दराडे यांचे वास्तव्य असलेला मलबार हिल येथील बंगला महापौर निवास स्थानासाठी मिळावा, अशी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची मागणी आहे. मात्र गेले दोन वर्षे यासाठी वारंवार महापालिकेने पत्रव्यवहार करूनही दराडे दाम्पत्यांनी बंगला खाली केलेला नाही. हा बांगला २०२८ पर्यंत त्यांच्याकडेच राहील, असे राज्य शासनानेही स्पष्ट केले आहे.
या वादावर पडदा टाकण्यासाठी शिवाजी पार्क येथील महापालिकेचे क्रीडाभवन व मनोरंजन मैदानाची जागा नवीन महापौर निवासासाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. तसे बदलही राज्य शासनाच्या नगर विकास खात्याने केले. मात्र हे क्रीडा भवन १९५५ पूर्वीचे असून यामध्ये महापालिकेचे दहा हजार सभासद आहेत. त्यामुळे २० हजार चाै.फुटाची ही जागा पाडून त्या ठिकाणी महापाैर निवासस्थान उभे राहणार आहे. ताेपर्यंत विद्यमान महापाैरांना भायखळा येथील बंगल्याचं जावे लागणार आहे.
महापौर बंगला होऊ देणार नाही
क्रीडा भावनाची जागा पालिका कर्मचाऱ्यांची असल्याने त्या ठिकाणी महापौर बंगला होऊ देणार नाही, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेतून आज दिला.
मनसेला पालिकेचे द्वार बंद
मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे या पक्षात आता केवळ एक नगरसेवक उरला आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालय आता मनसेचे राहिलेले नाही. त्यामुळे नियमानुसार मनसेला रोखण्यासाठी मुख्य जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने महापालिकेतील पत्रकार कक्ष आणि मनसे कार्यालय बंद केले. परंतु संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी मुख्य जनसंपर्क अधिकारी विजय खबाले आणि मुख्य चिटणीस प्रकाश जेकट यांच्या दालनात धडक देत त्यांना जाब विचारला. त्यामुळे मुखयलायात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मनसे- शिवसेना आमने सामने
शिवसेना घाबरल्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद होऊ न देण्याचा प्रयत्न केला असा आरोप मनसेचे सरचिटणीस देशपांडे यांनी केला. तर या पत्रकार परिषदेबाबत आपल्याला काही माहीतच नसल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.