Join us

प्रतिपालिका सभागृह; मनसेचा महापौर कोण?; मंत्र्यांसह प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पाठविले निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:21 IST

लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मनसेच्यावतीने हे प्रतिसभागृह भरविण्यात येणार आहे.

मुंबई : मनसेकडून प्रतिमहापालिका सभागृहाचे आयोजन केले आहे. जनतेच्या विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे. २६ एप्रिल महापालिका मुख्यालयासमोरील मुंबई मराठी पत्रकार संघात हे प्रतिसभागृह भरविण्यात येणार आहे. यावेळी तटस्थ व्यक्तीला प्रतिमहापौर पदाचा मान देण्यात येणार असून, मनसे नेते प्रेक्षक गॅलरीत बसून कामकाज पाहतील. या प्रतिसभागृहासाठी प्रमुख पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे पाठविण्यात आली आहेत.

पालिका निवडणूक न झाल्याने सध्या मुंबईचा कारभार प्रशासन चालवीत आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मनसेच्यावतीने हे प्रतिसभागृह भरविण्यात येणार आहे. यासाठी भाजपचे मुंबई अध्यक्ष व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, शिंदे गटाचे नेते व उद्योग मंत्री उदय सामंत, उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव , राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांना मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी निमंत्रण पाठविले आहे.

राजकीय पक्षांनी सहभागी होण्याचे केले आवाहन

प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन चाकांवर मुंबई महानगरपालिका चालते. पण, गेल्या तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी हे चाक बंद झाले आहे.

मुंबईत अनेक समस्यांवर चर्चा होऊन मार्ग निघावा अशी जनभावना आहे. पण, पालिका सभागृहच अस्तित्वात नसल्याने या प्रश्नांची चर्चा होण्याच्या उद्देशाने प्रतिसभागृहाची संकल्पना मांडण्यात आली आहे.

पालिका प्रशासनाला या प्रश्नांची जाणीव होऊन त्यावर मार्ग निघण्यासाठी हे व्यासपीठ असून, यात राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :मनसेमुंबई महानगरपालिकाभाजपाउदय सामंत