"मनसेचा जन्म मराठी माणसांसाठी, अमराठी लोकांनी मराठीचा आदर करावा!"
By मुकेश चव्हाण | Published: December 7, 2020 06:25 PM2020-12-07T18:25:42+5:302020-12-07T18:44:43+5:30
मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका भाजपला पूरक ठरेल का किंवा त्यांना सोबत घेतल्यास फायदा होईल का? हे आज सांगता येणार नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आमची व्यापक भूमिका आहे. राज ठाकरे यांची मराठी लोकांबाबत जी भूमिका आहे ती आम्हाला मान्यच आहे. मात्र मराठी लोकांच्या हक्काकरता लढणं म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणं, त्यांच्यावर हल्ले करणं हे आम्हाला मान्य नाही, असं विधान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर आता मनसेने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधताना मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेबद्दल आपलं मत व्यक्त केलं होते. त्यानंतर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नितीन सरदेसाई म्हणाले की, अनेक वर्ष गेल्यानंतरसुद्धा मनसेचं मराठीपण नक्की काय आहे, हे कधाचीत कोणाच्या लक्षात आलं नसेल तर मी सांगतो की, मनसेचं मराठीपण खूप व्यापक आहे. महाराष्ट्राचे जे भूमिपूत्र आहे त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं, मराठी भाषेचा वापर, जे महाराष्ट्रात राहतात त्यांनी मराठी संस्कृतीचा आदर करणं, हा मनसेच्या मराठी मुद्द्याचा अर्थ आहे. जर हा मुद्दा कोणाच्या दर लक्षात आला नसेल तर यावर चर्चा होऊ शकते, असं नितीन सरदेसाई यांनी सांगितले.
मनसेचा जन्म हा मराठी लोकांसाठी झाला आहे. त्यामुळे तो बाजूला ठेवला जाणार नाही. मराठीचा मुद्दा मनसे कधीही डावलणार नाही, असं नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील अमराठी लोकांनी जर मराठी भाषेचा, संस्कृतीचा, मराठी लोकांचा आदर केला तर मनसेकडून विरोध होणार नाही. अमराठी लोक जेव्हा मराठी भाषेचा अनादर करतात तेव्हा मनसेकडून विरोध केला जातो. विरोधाला विरोध म्हणून करत नाही, असं मत नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केलं आहे.
परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही- पाटील
राज ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवर तळमळीनं रिऍक्ट होतात. पण आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचं धोरण बदलायला हवं. त्यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असं भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबदल दुमत नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.