Join us

शिवसेना भवनासमोर मनसेने लावली हनुमान चालिसा; रामनवमीचं साधलं औचित्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 10:02 AM

मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेनं आज थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं.

मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाढव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी भोंगे लावून हनुमान चालिसा लावल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर आज चक्क मनसेने मुंबईतील 'शिवसेना भवन'समोर हनुमान चालिसा पठण केलं.

मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेनं आज थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केलं. आज रामनवमी उत्सव आहे. त्याचं औचित्य साधून मनसेनं शिवसेनेला डिवचलं. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकाराने शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा भोंगाद्वारे लावण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच भोंगे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आले. 

सदर प्रकरणावर यशवंत किल्लेदार म्हणाले की, आज राम नवमीचा सण आहे. त्यामुळे सर्व सण मोठ्या उत्साहात सादर करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानूसार आम्ही विविध ठिकाणी राम नवमी साजरी करत आहोत. तसेच मनसैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक रथ तयार केला आणि त्याच्यामाध्यमातून मुंबईतील अनेक भागत जाऊन हनुमान चालिसा लावण्यात येत आहे, असं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं. 

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवसेना भवन ही काही मशीद नाही. ज्याच्या समोर हनुमान चालीसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचं पवित्र स्थळ आहे.  मग कारवाई का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. 

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पध्दतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे. ज्या टॅक्सीवर स्पीकर लावण्यात आले होते. ती टॅक्सी विभागात फिरवण्यात येणार होती. राम नवमी निमित्त हनुमान चालीसा लावणे गुन्हा आहे का?, असा सवालही संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेना