63 टक्के लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर नाराज; 'मनसे' मत मांडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 01:16 AM2020-08-26T01:16:15+5:302020-08-26T07:55:09+5:30
सोशल मीडियातून मनसेने विविध विविध प्रश्नांवर लोकांकडून उत्तरे मागितली. सात दिवसांत एकूण ५४ हजार १७७ लोकांनी मनसेच्या या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऑनलाइन सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी पक्षाने जाहीर केला. ७० टक्के लोकांनी लॉकडाऊन संपविण्याची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर ६३ टक्के लोक नाराज असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाल्याचा दावा मनसेने केला आहे.
सोशल मीडियातून मनसेने विविध विविध प्रश्नांवर लोकांकडून उत्तरे मागितली. सात दिवसांत एकूण ५४ हजार १७७ लोकांनी मनसेच्या या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी आज या सर्वेक्षणाचा कौल सोशल मीडियातून जारी केला. सर्व्हेचा कौल जाहीर करण्यात आला आहे. ७०.३ टक्के लोकांनी लॉकडाऊन संपुष्टात आणण्यास अनुकूलता दाखविली आहे. तर, २६ टक्के लोकांनी त्यास नकार दर्शविला. ३.७ लोकांनी माहिती नाही, असा पर्याय निवडला.
लॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्र्यांनी घरातच बसून केलेल्या कामकाजाबद्दल समाधानी आहात का, या प्रश्नावर २८.४ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले आहे. तर, ६३.६ लोकांनी नाही असे उत्तर दिले आणि ८ टक्के लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडला. ८९.८ टक्के लोकांना लॉकडाऊनमुळे नोकरी/उद्योगधंद्यावर नकारात्मक परिणाम झाल्याचे वाटते. तर, ८.७ टक्के लोकांना असा परिणाम झाल्याचे वाटत नाही आणि १.५ टक्के लोकांना माहिती नाही. शिवाय, या काळात राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली नसल्याचे ८४.९ टक्के लोकांचे म्हणणे असून ८.७ टक्के लोकांना योग्य मदत मिळाल्याचे वाटते. तर, ६.४ टक्के लोकांनी माहीत नाहीचा पर्याय निवडला.
शिक्षण धोरण असमाधानी
शिक्षणाबाबत राज्य सरकारच्या निर्णयाबाबत ५२.४ टक्के लोकांनी तर शालेय फीबाबतच्या सरकारी धोरणावर ७४.३ टक्के लोकांनी नकारात्मक पर्याय निवडले. वीजबिलांच्या प्रश्नावरव सर्वाधिक ९०.३ टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे नोंदवले.