घुसखोरांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा; 'मातोश्री'च्या बाहेर झळकले पोस्टर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:19 AM2020-02-28T11:19:33+5:302020-02-28T11:25:51+5:30
MNS: पुण्यात बांगलादेशी घुसखोर म्हणून पाहणी करायल्या गेल्यानंतर ते भारतीय असल्याचं कळालं, त्यामुळे या लोकांनी मनसेविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे मनसेने आता सावध पवित्रा घेतला आहे.
मुंबई - बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत मनसेने आझाद मैदान येथे भव्य मोर्चा काढला, पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हटाव अशी मागणी राज ठाकरेंनी केली. त्यानंतर राज्यातील विविध भागात मनसे कार्यकर्त्यांकडून घुसखोरांसाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली.
पुण्यात बांगलादेशी घुसखोर म्हणून पाहणी करायल्या गेल्यानंतर ते भारतीय असल्याचं कळालं, त्यामुळे या लोकांनी मनसेविरोधात तक्रार दाखल केली. त्यामुळे मनसेने आता सावध पवित्रा घेतला आहे. औरंगाबाद येथे बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना ५ हजार रोख रक्कम देण्यात येईल असे पोस्टर्स लावले त्यानंतर मुंबईतही अशाप्रकारचे बॅनर्स मनसेकडून झळकले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात अशाप्रकारचे पोस्टर्स मनसेकडून लावण्यात आले आहेत. मनसेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी हे बॅनर्स लावलेत. त्यावर घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा असा उल्लेख करत लिहिलं आहे की, पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदूस्थानातून हाकललंच पाहिजे. या मोहिमेत समोर आलेल्या माहितीची शहानिशा करुन सत्यता पटल्यानंतर माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस ५ हजार ५५५ रुपये दिले जाईल. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव संपूर्ण प्रक्रियेत गुप्त ठेवण्यात येईल असंही अखिल चित्रे यांनी सांगितले आहे.
घुसखोर कळवा..बक्षीस मिळवा !
— Akhil Chitre (@akhil1485) February 28, 2020
वांद्र्यातील मोहल्ले धुसखोर मुक्त करण्याचा मनसे प्रयत्न @mnsadhikrut@mnsadhikrut09@mns9smspic.twitter.com/mXq3Nu7p84
यापूर्वीही मनसेकडून मातोश्रीच्या अंगणात पोस्टर लावण्यात आले होते. घुसखोरांना हाकला ही भूमिका बाळासाहेबांची आहे त्यामुळे उगाच श्रेय घेऊ नये असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला होता. त्यानंतर माननीय मुख्यमंत्रीसाहेब पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकलंलच पाहिजे हीच आपली भूमिका असेल तर प्रथम वांद्रेतील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असं आव्हान मनसेकडून देण्यात आलं होतं.
दरम्यान, औरंगाबादमध्येही मनसेने घुसखोरांना पकडून दिल्यास पाच हजार रुपये बक्षीस म्हणून देऊ असं जाहीर केलं आहे. आकाशवाणी चौकात मनसेने एक स्टॉल उभारला आहे. या स्टॉलवर घुसखोरांची गुप्तपणे माहिती द्यायची. माहिती देणाऱ्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. मात्र, घुसखोरांची माहिती खरी ठरल्यानंतरच माहिती देणाऱ्या व्यक्तिला पाच हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार असल्याचं मनसेने स्पष्ट केलं आहे.