राम नव्हे रावण!, राम कदमांविरोधात मनसेची पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 08:03 AM2018-09-05T08:03:19+5:302018-09-05T08:36:55+5:30
मुली पळवण्याबाबत बेताल विधान केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून सडकून टीका होत आहे. मनसेकडूनही त्यांच्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
मुंबई - मुली पळवण्याबाबत बेताल विधान केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार राम कदम यांच्यावर सर्व स्तरातून सडकून टीका होत आहे. 'नकार असला तरीही मुलगी पळवून आणण्यात तुमची मदत करतो', असे बेताल विधान राम कदम यांनी घाटकोपर येथे दहीहंडी उत्सवात गोविंदांशी बोलताना केले होते. राम कदमांच्या या बेताल वक्तव्याविरोधात मनसेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरमध्ये ''राम नव्हे रावण'',असा राम कदम यांचा उल्लेख करण्यात आला आहे. घाटकोपर, भिवंडी आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. दरम्यान, मनसेकडून लावण्यात आलेले पोस्टर्स पोलिसांनी हटवले आहेत.
(मुलगी पसंत असेल, तर पळवून आणण्यास मदत करू; भाजपा आमदार राम कदमांचं वादग्रस्त विधान)
(मुलींना पळवण्याचा सल्ला देणाऱ्या राम कदमांची जितेंद्र आव्हाडांकडून 'शाळा')
राम कदमांविरोधात मनसेची पोस्टरबाजी
''वाह रे भाजपा सरकार... वाह रे मुख्यमंत्री तुमचा आमदार... मतदारांनो आपल्या मुलींना सांभाळा स्वयंघोषित दयावान, डॅशिंग भाजप आमदार तुमच्या मुलींना पळवणार आहे. जर आमदार किंवा त्यांच्या बगलबच्च्यांनी असे केले तर पोलिसात तक्रार करा आणि आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपल्या मुलींचे रक्षण करण्यासाठी'', असा मजकूर पोस्टरमध्ये मांडण्यात आला आहे.
विशेष म्हणजे ज्या दहीहंडी उत्सवात राम कदम यांनी बेताल विधान केले, त्या उत्सवास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. कदम यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असून सर्वसामान्यही सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत.
'कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित?'
राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केला आहे. 'बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहीकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदारानं तोडले अकलेचे तारे!', असे ट्विट करत 'कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित?', असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
बेताल वक्तव्य करणारा भाजपा नेत्यांमध्ये आणखी ऐकाची भर.. रक्षाबंधन , दहिकाला उत्सव या पवित्र सणा दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे !
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 4, 2018
कशा राहतील यांचा राज्यात महिला सुरक्षित? pic.twitter.com/Z5JAx5ewrN
राम कदमांनी खेद व्यक्त केला
दरम्यान, लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांनी त्यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. दुखावल्या असतील तर मी खेद करतो, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. माझं विधान अर्धवट पसरवून संभ्रम निर्माण करण्यात आला, असं म्हणत त्यांनी या प्रकरणाचं खापर विरोधकांवर फोडलं आहे.
कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नव्हता , दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो . अर्धवट 54 Sec विधान काही विरोधकांनी पसरवून सम्भ्रम निर्माण केला दुसऱ्या दिवशी ! आदल्या दिवशी दुपारी मीडिया पत्रकार उपस्थित होते . त्यानी आक्षेप घेतला नाही कारन त्यानी संपूर्ण सम्भाषण ऐकले होते
— Ram Kadam (@ramkadam) September 4, 2018
काय म्हणाले होते राम कदम?
भाजपा आमदार राम कदम यांनी सोमवारी घाटकोपरमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित तरुणांशी बोलताना राम कदम यांनी वादग्रस्त विधान केलं. 'एखाद्या मुलानं एखाद्या मुलीला प्रपोज केलं असेल, मात्र तिचा नकार असेल, तर त्यानं त्याच्या आई-वडिलांना घेऊन माझ्याकडे यावं. त्या मुलाच्या पालकांना मुलगी पसंत असल्यास त्या मुलीला पळवून आणण्यात मी मदत करेन. हे चुकीचं असेल तरी मी तुम्हाला 100 टक्के मदत करेन,' असं राम कदम दहीहंडी उत्सवात बोलताना म्हणाले.